वृत्तसंस्था/ ग्लॅस्गो
येथे सुरू असलेल्या बिली जिन किंग चषक फायनल्स टेनिस स्पर्धेत शुक्रवारी स्वित्झर्लंडने कॅनडाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. या लढतीत स्वीसच्या गोलुबिक आणि बेन्सिक यांनी आपले एकेरीचे सामने जिंकले.
स्वीसच्या व्हिक्टोरिया गोलुबिकने एकेरीच्या सामन्यात कॅनडाच्या बियान्का अँड्रेस्क्युचा 2-6, 6-3, 6-4 अशा सेटस्मध्ये पराभव केला. दुसऱया एकेरी सामन्यात स्वीसच्या बेलिंडा बेन्सिकने कॅनडाच्या लैला फर्नांडिसचा 6-0, 7-5 असा फडशा पाडला. दोन्ही एकेरीचे सामने जिंकत स्वीसने कॅनडावर निर्विवाद आघाडी मिळवली. ड गटातील झेक प्रजासत्ताक आणि अमेरिका यांच्यात लढत होत आहे. या लढतीतील विजयी संघाबरोबर स्वीसचा उपांत्य फेरीचा सामना होईल.