चित्रपटाचे पोस्टर सादर
तापसी पन्नू पुन्हा एकदा हसीन दिलरुबा म्हणून दिसून येणार आहे. तिने ‘फिर आई हसीन दिलरुबा’चे पहिले पोस्टर शेअर करत चित्रपटाची घोषणा केली आहे. आनंद एल राय यांच्या दिग्दर्शनाखालील या चित्रपटात विक्रांत मैसी आणि सनी कौशल देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट जुलै 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. तर नवा चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होणार याची घोषणा करण्यात आलेली नाही.
तापसीने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तिचा चेहरा ताजमहालच्या दिशेने दिसून येतो. या चित्रपटात यावेळी आगरा येथील कहाणी दर्शविण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. मागील चित्रपटात हर्षवर्धन राणेने भूमिका साकारली होती. नव्या चित्रपटात त्याच्याऐवजी सनी कौशलची वर्णी लागली आहे. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये ‘एक नए शहर में, फिर एक बार… तहलका मचाने आ रही है हमारी हसीन दिलरुबा’ असे नमूद करण्यात आले आहे.
तापसी पन्नू याचबरोबर राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल तापसीला मोठय़ा अपेक्षा आहेत. तापसीचा यापूर्वीचा चित्रपट फ्लॉप ठरल्याने तिला एका हिट चित्रपटाची गरज आहे.