बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने स्वतःचा आगामी चित्रपट दृश्यम 2 चे चित्रिकरण सुरू केले आहे. तब्बूने स्वतःच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक छायाचित्र शेअर करत याची माहिती दिली आहे. अभिनेत्रीकडुन शेअर करण्यात आलेल्या या छायाचित्रात एक क्लॅप बोर्ड दिसून येत असून यात चित्रपटाचे नाव नमूद आहे.
या चित्रपटात तब्बूसोबत अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. तर चित्रपटात श्रिया सरन आणि इशिता दत्ता देखील झळकणार आहेत. अभिषेक पाठक यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱया या चित्रपटात अजय देवगण पुन्हा विजय साळगावकर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर तब्बू देखील पोलीस महानिरीक्षकाच्या भूमिकेत दिसून येईल.
दृश्यम 2 हा चित्रपट फेब्रुवारी 2021 मध्ये अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेला मल्याळी चित्रपट ‘दृश्यम 2’चा हिंदी रिमेक असणार आहे. मल्याळी चित्रपटात दक्षिणेतील सुपरस्टार मोहन लाल यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
तब्बू याचबरोबर भूल भुलैया 2 या चित्रपटात काम करत आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला आहे. अजय देवगण याच्यासोबत ती ‘भोला या चित्रपटात देखील दिसून येणार आहे.