Tarun Bharat

युक्रेनच्या दिशेने तैवानची वाटचाल?

Advertisements

चीन सरकारचा जबर विरोध डावलून अमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी 2 आणि 3 ऑगस्टला तैवानचा 19 तासांचा दौरा केला. सभापती पॅलोसी यांना घेऊन येणाऱया विमानाला एकूण 15 अमेरिकन लढाऊ विमानांनी सुरक्षा पुरविली होती. पेलोसी यांनी आपली तैवान भेट संपवून दक्षिण कोरियाच्या दौऱयावर निघून गेल्यानंतर चीनी हवाई दलाच्या 27 लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश करून थेट धमकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अमेरिकेच्या सभापती पेलोसी यांच्या दौऱयानंतर हिंद प्रशांत महासागर परिसरात आता नव्याने तणाव निर्माण झालेला असून युक्रेनच्या वाटेवर तैवानची वाटचाल होणार की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. 

अमेरिकेच्या 82 वर्षिय संसद सभापती श्रीमती नॅन्सी पेलोसी यांचा तैवान दौरा प्रचंढ गाजत आहे. अमेरिकेत तिसऱया स्थानावर असलेल्या श्रीमती पेलोसी यांनी तैवान दौऱयाची घोषणा केल्यानंतर चीन सरकारने आपल्या विदेश मंत्रालयामार्फत त्यांची ही भेट रद्द करण्यासाठी बराच आटापिटा केला होता. अमेरिकन सभापतींचा   दौरा होणार नाही, अशी अटकळ चीन सरकारने बांधली होती. पण रशिया आणि युक्रेन युद्धात बॅकफूटवर आलेल्या अमेरिकेने यावेळी आक्रमकपणे श्रीमती पेलोसी यांचा दौरा यशस्वीरित्या घडवून आणला. केवळ 19 तासांच्या या दौऱयामुळे इंडो पॅसिफिक परिसर आता तणावग्रस्त बनला आहे.

अमेरिकेच्या विद्यमान सभापतींनी 25 वर्षांपूर्वी तैवानचा दौरा केला होता.  पेलोसी यांचा हा दुसरा तैवान दौरा असून यावेळी त्या अमेरिकेच्या तृतीय नागरिक म्हणून येत असल्याने चीनचा या दौऱयाचा जोरदार आक्षेप होता. त्यांच्या दौऱयाची तयारी पाहून गेल्या दोन आठवडय़ापासून चीनी सैनिक, नौदल आणि हवाई दलाने जोरदार युद्धाभ्यास सुरु केला होता. तसेच श्रीमती पेलोसी यांच्या मार्गात अडथळा आणण्यासाठी चीनी युद्धनौकांनी तैवानची अक्षरशा नाकाबंदी केली होती. तर अमेरिकेने श्रीमती पेलोसी यांचा तैवान दौरा घडवून आणण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी अमेरिकेने आपल्या पाच विमानवाहू युद्धानौका त्यांच्या मोठय़ा लवाजम्यासह तैवानच्या अगदी जवळ आणून ठेवल्या होत्या. तसेच श्रीमती पेलोसी यांना घेऊन येणाऱया विमानाला अमेरिकन नौदल आणि हवाई दलाच्या 15 विमानांनी संरक्षण दिले होते. यात 10 लढाऊ विमाने आणि 5 हवाई टँकरचा समावेश होता.

तैवान दौऱयाच्या दरम्यान श्रीमती पेलोसी यांचे तैवानबरोबर चांगले घरोब्याचे संबंध असल्याचे दिसून येते होते. तैवानच्या राष्ट्राध्यक्षा श्रीमती त्साई ईग्वेंन या दौऱयावेळी चांगल्या हर्षोल्लीत झालेल्या होत्या. यावेळी त्यांनी संपूर्ण देशाच्यावतीने श्रीमती पेलोसी यांना तैवानचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरवान्वित केले. दिवसभरात त्यांचा भरगच्च कार्यक्रम होता. तसेच त्यांच्या या दौऱयाने तैवानवासियांच्या डोक्यावरील कित्येक वर्षांचा तणाव काही काळासाठी दूर झाला होता. तसेच या धाडसी अमेरिकन महिलेचे कौतुक करण्यासाठी श्रीमती पेलोसी यांच्या गाडीच्या ताफ्याला दोन्ही बाजूंनी उभे राहून तैवानी नागरिकांनी अभिवादन केले. पेलोसी यांच्या आगमनाने तैवानच्या जनतेला दिलासा मिळाला. गेल्या सात आठ वर्षांपासून तैवानी जनतेला चीनी सरकारने दहशतीखाली ठेवलेले आहे. यापूर्वी साधारण 50 वर्षांपूर्वी चीनी साम्यवादी सरकारने तिबेट आपल्या ताब्यात घेतले होते. बावीस वर्षांपूर्वी पोर्तुगिज वसाहत असलेल्या माकाऊ या कॅसिनोसाठी प्रसिद्ध असलेल्या 31 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या बेटावर चीन सरकारने आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे. त्यानंतर शी जिन पिंग यांच्या राजवटीने हाँगकाँगवर आपले प्राबल्य स्थापित केलेले आहे. आता वेळ आहे, ती तैवानची!

रशियाने युक्रेनवर हल्ला करून त्यांना नाटो देशांच्या संघटनेत समाविष्ट होण्यास आपला आक्रमक विरोध दर्शविला. युक्रेनला अमेरिकेसहीत नाटोच्या युरोपमधील सदस्य राष्ट्रांनी सर्वप्रकारच्या मदतीची हमी दिली. मात्र रशियाने प्रत्यक्षात युद्ध सुरु केल्यानंतर या तथाकथित मित्रराष्ट्रांनी युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेण्यास स्पष्ट नकार दिला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलादिमीर झेलेन्स्की यांनी या सर्व मित्रराष्ट्रांचे पाय धरले, पण त्यांच्या हाती काही लागले नाही. युक्रेन आणि रशियातील युद्धाला आता पाच महिने होऊन गेले. युक्रेनच्या मित्रराष्ट्रांनी सर्व प्रकारची रसद पुरविली तरी या देशाची स्थिती आता नाजूक बनली आहे. आता रशियाप्रमाणेच चीन तैवानला घेरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे युक्रेनच्या दिशेने तैवानची स्थिती होणार की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

तैवान आणि युक्रेन यांच्यात बराच फरक आहे. युक्रेन हा अवाढव्य देश असल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची दहा दिवसांत कामगिरी फत्ते करण्याची गणिते फोल ठरली. दुसऱया बाजूने पाहिल्यास तैवान हा द्विपकल्पावरील अत्यंत छोटा देश असून अवाढव्य चीनी सेना अवघ्या काही दिवसांत आपली कामगिरी फत्ते करू शकेल असे वाटणे स्वाभाविकच आहे. अशावेळी इतिहासात डोकावले असता, 1948 साली स्थापन झालेल्या इस्त्रायल या चिमुकल्या ज्यू लोकांच्या देशाला जन्मताच संपविण्याचा विडा बलाढय़ अशा अरब राष्ट्रांनी उचलला. इस्त्रायलच्या स्थापनेनंतर त्याच्या भोवताली असलेल्या डझनभर राष्ट्रांनी या देशाला नेस्तनाबूत करण्यासाठी तीन व्यापक युद्धे लढली. या तिनही लढायांत अरब राष्ट्रांनी मार खाल्ला. आज यातील इजिप्त, लिबिया, सिरीया, पेलास्टाईन आणि लेबनॉन हालाखीच्या स्थितीत पोहोचलेले आहे. तसेच सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीने इस्त्रायलबरोबर मैत्रीसंबंध प्रस्थापित केले आहेत तर 1963 च्या दरम्यान अमेरिकेने व्हिएतनाम या देशावर तब्बल 10 वर्षे युद्ध लादले. जगद्जेता म्हणवणाऱया अमेरिकेला व्हिएतनाम युद्धाचे नाव काढल्यास शरमेने मान खाली घालावी लागते. दुसऱया महायुद्धानंतर अमेरिकेला पराभवाची चव चाखली ती, व्हिएतनामच्या गनिमी काव्याने. अर्थात हा गनिमी कावा महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाल्याचे व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांनी जगजाहीर केले होते. इतिहास पाहता तैवानवरील चीनी हल्ला युक्रेनच्या दिशेने जाणार की इस्त्रायलची री ओढणार याबाबत बऱयाच जणांचे दुमत आहे. युक्रेनचे युद्ध बरेच लांबलेले असून ते व्हिएतनामच्या दिशेने जाते की काय असेही वाटू लागले. तर तैवानवर हल्ला झाल्यास हा देश कितपत तग धरू शकेल, यावर चर्चा सुरु आहे. तैवानमधील नेते आणि नागरिक इस्त्रायलप्रमाणेच अत्यंत चिवट, देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले आहेत. तैवानने सैन्यशक्ती प्रबळ करण्यावर भर दिलाय. इस्त्रायलप्रमाणेच या देशापाशी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सकडून खरेदी केलेली अत्याधुनिक विमाने व युद्ध सामग्री आहे. ही चीनी बलाढय़ ताकतीपुढे नगण्यच म्हणावी लागेल. मात्र तैवानच्या चिवटपणाला आणि प्रखर राष्ट्रभक्तीला अमेरिकेची साथ लाभण्याची मोठी शक्यता आहे. सभापतींच्या तैवान भेटीनंतर चीनकडून कारवाई झाल्यास अमेरिका यात प्रत्यक्ष भाग घेण्याची शक्यता अधिक आहे.

प्रशांत कामत

Related Stories

तिसऱया सत्रातही बाजार घसरणीत

Patil_p

आपण सारेच अपराधी आहोत तिचे!

Omkar B

काँग्रेस नवीन ‘अहमद पटेल’ च्या शोधात

Patil_p

अटलजी एक व्रतस्थ याज्ञिक

Patil_p

बिट कॉईनचा ‘टॉस’ कोणाच्या पथ्यावर?

Amit Kulkarni

उकळते तेल!

Patil_p
error: Content is protected !!