अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा : जिल्हाधिकाऱयांना उप्पार समाजाचे निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
चित्रदुर्ग मुरुघा मठाच्या स्वामींनी अनुसूचित जाती-जमातीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटले असून गुरुवारी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी जिह्यातील उप्पार समाज आणि इतर अनुसूचित समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तातडीने त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे होते. मात्र कारवाई करण्यास विलंब करण्यात आला आहे. सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप करत हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हीच घटना एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने केली असती तर त्याला तातडीने अटक केली असती. मात्र स्वामी आहेत म्हणून त्यांना ही मुभा दिली जात आहे, असा आरोपही करण्यात आला.
सदर स्वामींवर 376(2)(एन), 376(3) यासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उप्पार समाजाचे राज्याध्यक्ष ऍड. विष्णू लातूर, ऍड. अनिल शिंदे, मंजुनाथ राजप्पण्णावर, ऍड. एन. आर. लातूर, अरुण सवतीकाई, ऍड. यशवंत लमाणी, ऍड. दऱयाप्पा बिळगी यांच्यासह इतर वकील व नागरिक उपस्थित होते.