अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरेल : कळंगूट वासियांचा इशारा
प्रतिनिधी /म्हापसा
येत्या आठ दिवसाच्या आत कळंगूट पोलिसांनी शाहीन सौदागर कठोर कारवाई करीत या प्रकरणाचा सखोल तपास करावा व संशयित आरोपींना गजाआड करावे तसेच बेकायदा चाललेल्या डान्सबार व नाईट क्लबवर योग्य कारवाई करीत ते बंद पाडावे. ही कारवाई न झाल्यास कळंगूट ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा कळंगूट खोब्रावाडा येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या जाहीर बैठकीवेळी झाला. ग्रामस्थ नितेश चानू चोडणकर, मिनेश (मुन्ना) कळंगुटकर, लॉरेन्स फर्नांडिस, माही सिमेपुरुषकर यांनी हा एल्गार केला असून बेकायदेशीर अनैतिक व्यवसाय यापुढे कळंगुटमध्ये खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे.
बुधवारी सायंकाळी खोब्रावाडा कळंगूट येथील एका नाईट क्लबच्या आवारात स्थानिक ग्रामस्थांकडून आयोजित भरगच्च पत्रकार परिषदेत नितेश चोडणकर व इतर बोलत होते. दरम्यान दि. 7 मे 2022 च्या रात्री खोब्रावाडा कळंगूट येथे बेकायदा चालणाऱया एका नाईट क्लबमध्ये मुली पुरविण्याचे आमिष दाखवित दोघां परप्रांतीय तरुणांकडून देशी पर्यटकांना जबर मारहाण करीत त्यांना लुबाडण्याची घटना घडली होती. यावेळी त्या दलाल तरुणांच्या हातून आपली कशीबशी सुटका करून घेत देशी पर्यटकांनी जवळच्या दुकानात आश्रय घेतला असता त्या संशयित दलाल तरुणांनी क्लबच्या बाऊन्सरच्या मदतीने पर्यटकांसहीत स्थानिक दुकानदारालाही मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. यावेळी संतापलेल्या स्थानिक लोकांकडून घटनास्थळी सापडलेल्या त्या दलाल तरुणांना यथेच्छ चोप देण्यात आला होता. दरम्यान यासंबंधात कळंगूट पोलिसात तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर व त्यांच्या पथकाकडून संशयित तरुणांना ताब्यात घेत एकाला जमावाच्या मारहाणीत जखमी झाल्याने उपचारासाठी त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
संशयित तरुणांच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या शाहीन सौदागर यांनी सोमवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मारहाणीत जखमी झालेली आपली दोन्ही मुले निरपराध असल्याचा दावा केला आहे. परंतु साहीन सौदागर या स्वतः याभागात बेकायदा चालणाऱया नाईट क्लबमध्ये महिला बाऊन्सर म्हणून काम करतात व आपल्या तरुण मुलांसहीत अनेक बेकायदा व्यवसायात गुंतल्याचा थेट आरोप नितेश चोडणकर व इतरांनी कळंगुटात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला असून साहीन सौदागर तसेच त्यांच्या मुलांकडून स्थानिक लोकांवर केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा असल्याचे चोडणकर यांनी यावेळी सांगितले.
घटनेमागे सत्य वेगळे- मिनेश कळंगुटकर
कळंगूट-बागा व परिसरात बेकायदा व्यवसायात गुंतलेल्या तसेच देशी पर्यटकांना डान्स बार तसेच नाईट क्लबची आमिषे दाखवित दिवसाढवळय़ा लुबाडणाऱया समाजकंटक तरुणांना लोकांकडून मारहाण झाल्याचे कारण पुढे करीत स्थानिक पोलिसांकडून गावातील काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे परंतु या घटनेमागील सत्य वेगळेच असून मारहाण करण्यात आलेले परप्रांतीय तरुण या भागातील अनेक अनैतिक व्यवसाय तसेच दलालीशी संबंधित आहेत त्यामुळे या प्रकरणाच्या खोलाशी जात त्या संशयित तरुणांना कळंगूट पोलिसांनी तात्काळ गजाआड करावे अशी मागणी यावेळी मिनेश कळंगुटकर यांनी केली.
अन्यथा ग्रामस्थ कारवाई करणार- माही सिमेपुरुषकर
बेकायदा डान्स बार तसेच नाईट क्लबमध्ये महिलांना लहान अल्पवयीन मुलांना घेऊन काय काम आहे याचा छडा पोलिसांनी लावावा. बेकायदा डान्स बार व नाईट क्लब कळंगुटमध्ये खुलेआम चालत असून त्यांना पोलिसांचा आशीर्वाद आहे. हे बेकायदेशीर क्लब आठ दिवसाच्या आत बंद करावे अन्यथा या विरुद्ध सर्व ग्रामस्थ उठून कारवाई करणार असल्याचा इशाराही यावेळी माही सिमेपुरुषकर यांनी दिला. रात्रीच्यावेळी एजंट लोक गावातील नागरिकांनाच येता जाता मुली पाहिजेत काय असा प्रश्न करीत असून कळंगूट वासियांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे सांगण्यात आले.