जिल्हाधिकाऱयांचा निर्देश : नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांची माहिती, आमदार दिगंबर कामत यांच्याकडून तुकडे कोसळलेल्या इमारतीची पाहणी
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिका क्षेत्रातील कमकुवत बनलेल्या जुन्या इमारती, ज्यांना पालिकेने नोटिसा जारी केल्या होत्या, त्या इमारती खाली करून पाडण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांनी दिले असल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली. सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी मडगावातील काही मुद्यांवर नगराध्यक्ष शिरोडकर यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी कमकुवत इमारतींसंदर्भातील विषयावर चर्चा झाली असता जिल्हाधिकाऱयांनी वरील निर्देश दिल्याचे सांगण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी मडगावच्या मध्यवर्ती शहरी भागात असलेल्या पिंपळकट्टय़ानजीकच्या एका जुन्या इमारतीच्या प्लास्टरचे तसेच क्राँक्रिटचे तुकडे रस्त्यावर कोसळल्याने एका युवतीला किरकोळ इजा झाली होती, तर इमारतीखाली पार्क केलेल्या एका कारचे नुकसान झाले होते. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील कमकुवत इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोमवारी सकाळी नगराध्यक्ष शिरोडकर यांच्यासह आमदार दिगंबर कामत यांनी सदर इमारतीची पाहणी केली. यावेळी नगरसेवक महेश आमोणकर, पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी मुख्याधिकारी मानुएल बार्रेटो उपस्थित होते.
यापूर्वी मडगाव पालिकेने ज्या 18 इमारतींना धोकादायक म्हणून जाहीर केले होते त्यापैकी केवळ सात इमारतींच्या मालकांनीच आपल्या इमारतीचे स्थिरता प्रमाणपत्र पालिकेला सादर केले आहे. इमारत खाली करावी या आशयाची नोटीस आम्ही त्यांना बजावलेली आहे. मध्यंतरीच्या काळात दुर्घटना घडली, तर त्याला इमारतमालक जबाबदार राहतील असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष शिरोडकर यांनी दिली.
पालिकेची अनास्था कारणीभूत : कुतिन्हो
शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी धोकादायक इमारतीप्रकरणी पालिका मंडळाची अनास्था कारणीभूत असल्याची टीका केली आहे.. कोणतीही इमारत धोकादायक बनल्यावर त्या इमारतीच्या मालकाला किंवा सोसायटीच्या पदाधिकाऱयांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून इमारतीच्या दुरुस्तीबाबत आदेश दिला पाहिजे. परंतु पालिका प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.
रेल्वे स्थानक-पिंपळकट्टा रस्त्यावर एकाच बाजूने पार्किंग
आमदार दिगंबर कामत यांनी नगराध्यक्ष शिरोडकर, काही नगरसेवक तसेच अधिकारी यांच्यासमवेत मडगावचा पालिका उद्यान परिसर, कोमुनिदाद इमारत, स्टेशन रोड तसेच पिंपळकट्टा येथील प्लास्टर व काँक्रिटचे तुकडे पडलेल्या इमारतीची पाहणी केली. यावेळी रेल्वे स्थानक ते पिंपळकट्टादरम्यानच्या रस्त्यावर उजव्या बाजूला वाहने उभी केली जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देश वाहतूक पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. वाहतूक पोलीस व पालिकेचे कामगार यावर देखरेख ठेवणार असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली. या रस्त्यावर दुतर्फा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने वरील निर्देश देण्यात आला आहे.