जमीन बिनशेती विभाजनचे काम करून देण्यासाठी मागितली लाच; लाच स्वीकारताना पकडले रंगेहाथ, कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ
चिपळूण प्रतिनिधी
बिनशेती जमिनीचे दोन समान हिस्से करून उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून बिनशेती जमीन विभाजनाचे आदेश प्राप्त करून घेण्यासाठी 45 हजार रूपयांची लाच घेताना पिंपळी-खुर्दच्या तलाठ्याला लालापतच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली. यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
अश्विन नंदगवळी (33) असे कारवाई झालेल्या तलाठ्यो नाव आहे. नंदगवळी याच्याकडे नांदिवसे गावा कारभार असून सध्या पिंपळी खुर्दा अतिरिक्त पदभार आहे. 37 वर्षीय तक्रारदार व त्यांचे सहहिस्सेदार यांच्या नावे असलेल्या बिनशेती जमिनीचे दोन समान हिस्से करून उपविभागीय अधिकारी कार्यालय चिपळूण यांच्याकडून बिनशेती जमिन विभाजनाचे आदेश प्राप्त करून घेण्याकरिता कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी 40 हजार रूपये व वेगळा सातबारा करण्यासाठी मंडल अधिकारी यांच्यासाठी 5 हजार रूपये असे एकूण 45 हजार रूपयांची त्याने 1 जून रोजी मागणी केली.
याची लाचलुचपत विभागाकडे तक्रार झाल्यानंतर वरील रक्कमेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानुसार गुरूवारी तलाठी कार्यालय पिंपळी खुर्द येथे सापळा रचून नंदगवळी याला 45 हजार रूपयांची लाच घेताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंध विभाग रत्नागिरो पोलीस निरीक्षक प्रविण ताटे, हेड. कॉन्स्टेबल संतोष कोळेकर, कॉन्स्टेबल हेमंत पवार, कॉन्स्टेबल राजेश गावकर, कॉन्स्टेबल प्रशांत कांबळे यांच्या पथकाने केली.