अनेक मुद्दय़ांवर झाली सहमती
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारत आणि फ्रान्स यांनी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद तसेच अन्य बहुपक्षीय मुद्दय़ांवर विचारविनिमय केला आहे. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी पाहता दोन्ही देशांनी सुरक्षा परिषदेच्या अजेंडय़ासह विविध मुद्दय़ांवर विचारांचे आदान-प्रदान केले आहे.
दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर सुरू असलेले सहकार्य मजबूत करण्यावर सहमती व्यक्त केली असल्याची माहिती विदेश मंत्रालयाने बुधवारी दिली आहे. सप्टेंबर अन् डिसेंबर महिन्यकात फ्रान्स आणि भारताच्या सुरक्षा परिषदेच्या आगामी अध्यक्षत्वादरम्यान स्वतःच्या प्राथमिकतांबद्दल परस्परांना माहिती दिली आहे.
17 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद मोदींनी दूरध्वनीद्वारे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत युक्रेन मुद्दय़ावर चर्चा केली होती. युक्रेनवर रशियाने लादलेले युद्ध आणि याच्या जागतिक परिणामांबद्दल विचारांचे आदानप्रदान दोन्ही नेत्यांनी केल्याची माहिती फ्रान्सच्या अध्यक्षीय कार्यालयाकडून देण्यात आली होती.
फ्रान्सच्या अध्यक्षांनी युक्रेनसाठीचा स्वतःचा पाठिंबा कायम राखण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला होता. तर दोन्ही नेत्यांनी संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यावर सहमती व्यक्त केली होती.