विदेशमंत्री एस. जयशंकर दौऱयावर : व्हिसा मुद्दा केला उपस्थित
वृत्तसंस्था /ऑकलंड
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी न्यूझीलंडच्या विदेश मंत्री नानाया महुता यांच्यासोबत गुरुवारी झालेल्या बैठकीदरम्यान हिंद-प्रशांत आणि युक्रेन संघर्षासारख्या आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवर चर्चा केली आहे. परस्परांच्या परंपरा आणि संस्कृतीचा सन्मान करणारे दोन्ही समाज उत्तम समकालीन संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे उद्गार जयशंकर यांनी बैठकीनंतर काढले आहेत.
हिंद-प्रशांत तसेच युक्रेन संघर्ष यासारख्या आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवर विचारांचे आदानप्रदान दोन्ही देशांनी केले आहे. आम्ही संयुक्त राष्ट्रसंघ तसेच राष्ट्रकुलासह बहुपक्षीय व्यासपीठांवर एकत्र काम करण्यास महत्त्व देत असल्याचे जयशंकर म्हणाले. हिंद-प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या सैन्य हालचालींच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका तसेच अनेक जागतिक शक्ती मुक्त तसेच समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्र सुनिश्चित करण्याच्या आवश्यकतेवर भर देत आहेत.
कोरोना संकट हाताळण्यासाठी न्यूझीलंडकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे भारतीय विद्यार्थी प्रभावित झाल्याचा मुद्दा जयशंकर यांनी चर्चेदरम्यान उपस्थित केला आहे. न्यूझीलंडमध्ये शिक्षण घेण्यास इच्छुक भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा प्रदान करण्याची प्रक्रिया जलद करण्याची विनंती जयशंकर यांनी केली आहे.
जयशंकर हे बुधवारी न्यूझीलंडमध्ये पोहोचले होते. तेथील भारतीय वंशाच्या मंत्री प्रियांका राधाकृष्णन यांची भेट घेतली होती. राधाकृष्णन या न्यूझीलंडच्या सामुदायिक आणि स्वैच्छिक क्षेत्र, युवा विषयक मंत्री आहेत. तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांच्यासोबत एका कार्यक्रमात भाग घेत जयशंकर यांनी त्या देशात अभूतपूर्व योगदान देणाऱया भारतीय समुदायाच्या लोकांना सन्मानित केले आहे.