क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युवजन क्रीडा खाते व क्रीडा सबलीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय दसरा क्रीडा स्पर्धांना मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला.
जिल्हा क्रीडांगणावर आयोजित या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार इरण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर आदि मान्यवर उपस्थित होते. इरण्णा कडाडी व अनिल बेनके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
रोहन घेवडी, अरूण माळी, शशांक पाटील, अविनाश मरनूर यांनी मैदानाभोवती क्रीडाज्योत फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. पाहुण्यांनी रंगी बेरंगी फुगे हवेत सोडून स्पर्धेचे उद्घाटन केले. सर्व खेळाडूंना प्रीती अपुरे हिने सर्वांना शपथ दिली.
यावेळी युवजन क्रीडा खात्याचे क्रीडा अधिकारी जिनेश्वर पडणार, बसवराज होसमठ, व्ही. एस. पाटील, संजीव नाईक, सदानंद मालशेट्टी, नागराज एन., जी. एन. पाटील, एच. एस. शिंगाडे, शंकर कोलकार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत महंमद अझरूद्दीन शेखजी यांनी केले. क्रीडा स्पर्धेची माहिती व्ही. एस. पाटील यांनी दिली. शेखजीनी सूत्रसंचालन तर व्ही. एस. पाटील यांनी आभार मानले.
व्हॉलिबॉल स्पर्धेच्या पुरूष गटातील अंतिम सामन्यात डीवायईएस संघाने विजेतेपद तर लिंगराज महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकाविले. महिलांच्या गटात डीवायईएस संघाने विजेतेपद तर शिवाजी हायस्कूल येळ्ळूर संघाने उपविजेतेपद पटकाविले. थ्रोबॉल स्पर्धेत पुरूष गटात बेळगाव वॉरियर्स संघाने विजेतेपद तर मच्छे इलेव्हन संघाने उपविजेतेपद पटकाविले.