ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांची शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क पदावरुन हकालपट्टी करण्यात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अनिल कोकीळ यांची निवड करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं सावंतांची हकालपट्टी आणि कोकीळ यांची निवड करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दिवसेंदिवस शिंदे गटातील संख्या वाढत आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्रिय झाले असून, त्यांनी शिवसेनेत फेरबदल करण्यास सुरूवात केली आहे. बंडखोर तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम-परंडा मतदार संघांचे आमदार आहेत. सोलापुरातील युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मनिष काळजे आणि माजी शिवेसेना जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तानाजी सावंत यांना पालकमंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी युवा सेनेचा जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांची हकालपट्टी करत नवे युवा सेना जिल्हा प्रमुख म्हणून बालाजी चौगुले यांची नियुक्ती केली आहे.
हेही वाचा : राज्यभर पावसाचा धडाका, कोकण, मध्य महाराष्ट्रावरील अतिवृष्टीचे ढग कायम
दरम्यान, काल उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि राज्य पर्यावरण समितीचे अध्यक्ष विजय नाहटा या दोन नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.