क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हुबळी येथे मंजुनाथ पाटकर बॅडमिंटन अकादमी आयोजित राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत बेळगावच्या तनिष्का कोरीशेट्टी हिने 15 वर्षांखालील एकेरीत विजेतेपद तर 17 वर्षाखालील एकेरीत उपविजेतेपद पटकाविले आहे.
हुबळी येथे या स्पर्धेत 15 वर्षांखालील गटात तनिष्का कोरीशेट्टी हिने उपांत्यपूर्व फेरीत रिटी एस. हीचा पराभव करुन उपांत्यफेरीत प्रवेश केला. उपांत्यफेरीत तनिष्काने अर्पिता जी. हिचा 15-8, 15-7 अशा सरळ गेम्स्मध्ये पराभव करुन अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात तनिष्काने तनुजा हिचा 21-15, 21-11 अशा गेम्स्मध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
17 वर्षाखालील गटात तनिष्काने उपांत्यफेरीत आकांक्षाचा 3-8 असा पराभव केला. उपांत्यफेरीत तनिष्काने अफजा हिचा 12-15, 15-9, 15-11 अशा गेम्स्मध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र अंतिम सामन्यात तनिष्काला ट्विंकल हिच्याकडून 21-15, 19-21, 21-13 असा पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत तिला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. तिला बॅडमिंटन प्रशिक्षक भूषण अणवेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.