क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे लीओ स्पोर्ट्स व प्ले एक्स्ट्रिम राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत बेळगावच्या कोरीशेट्टीने 13 वर्षाखालील गटात एकेरीमध्ये तिसऱया मानांकित बेंगळूरच्या गीतांजली मेननचा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
लिओ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरिय शटल बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य सामन्यात तनिष्काने मित्रा हिचा 15-7, 15-3 असा तर दुसऱया उपांत्य सामन्यात सातव्या मानांकित दिशा भटचा 15-12, 15-9 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत तनिष्का कोरीशेट्टीने गीतांजली मेननचा 15-9, 15-13 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तनिष्का कोरीशेट्टीला मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. तनिष्का ही डीपी स्कूलची विद्यार्थिनी असून, तिला बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे प्रमुख प्रशिक्षक भूषण अणवेकर व संघटनेचे सचिव अशोक पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.