ग्राहकांची खाती गोठविली : बँकांमध्ये जाण्यावर बंदी
वृत्तसंस्था /बीजिंग
चीनमध्ये मोठे बँकिंग संकट उभे ठाकले आहे. स्थिती इतकी बिकट झाल्याने अनेक बँकांनी खात्यांमधून पैसे काढण्यास बंदी घातली आहे. अशा स्थितीत हजारो लोक रस्त्यांवर एप्रिल महिन्यापासून निदर्शने करत आहेत. अनेक ठिकाणी निदर्शने हिंसक झाली आहेत. याचमुळे बँकांच्या परिसरात आता रणगाडे तैनात करण्यात आले आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून तो हेनान प्रांतातील आहे. तेथे अनेक रणगाडे रांगेत उभे असल्याचे दिसून येते. प्रशासनाने लोकांना बँकेत जाण्यापासून रोखण्यासाठी रणगाडे तैनात करण्याचा आदेश दिला आहे.
एप्रिल महिन्यात साउथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये एक लेख प्रकाशित झाला होता. यात चिनी बँकांमध्ये झालेल्या घोटाळय़ांबद्दल माहिती देण्यात आली होती. 40 अब्ज युआन म्हणजेच सुमारे 6 अब्ज डॉलर्स चीनच्या बँकिंग व्यवस्थेतून गायब झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर हेनान आणि अनहुई प्रांतात बँकांनी लोकांना खात्यांचा वापर करण्यापासून रोखले होते. यासाठी लोकांना ‘सिस्टीम अपग्रेड’चे निमित्त सांगण्यात आले होते.
चीनमध्ये लोकांना स्वतःच्या खात्यांमधून पैसे काढता येत नसल्याची स्थिती आहे. यामुळे संतप्त लोकांनी बँकांबाहेर निदर्शने सुरू केली ओत. बँकांनी कुठल्याही कारणाशिवाय आमची ठेव रक्कम गोठविल्याचे लोकांचे सांगणे आहे.
4 बँका सर्वाधिक प्रभावित
या पूर्ण प्रकरणात न्यू ओरिएंटल कंट्री बँक ऑफ कॅफेंग, जिचेंग हुआंगहुई कम्युनिटी बँक, शांगकाई हुइमिन काउंटी बँक आणि युजौ शिन मिन शेंग व्हिलेज बँकेवर सर्वाधिक प्रभाव पडला आहे. लोक तेथे 3 महिन्यांपासून फेऱया मारत आहेत, परंतु त्यांना बँकेत जाण्यापासून रोखले जात आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती
रस्त्यांवर रणगाडे तैनात झाल्याचे पाहून लोक याची तुलना तिआनमन चौकाच्या घटनेशी करत आहेत. 1989मध्ये लोकांनी तिआनमन चौकात सरकारच्या विरोधात निदर्शने केली होती. त्यावेळी सैन्याने निदर्शकांवर रणगाडे चढविले होते. या क्रूर घटनेत 3 हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. युरोपीय प्रसारमाध्यमांनी 10 हजार लोकांना जीव गमवावा लागल्याची भीती व्यक्त केली होती.
रक्कम काढण्यापासून रोखले
बँक ऑफ चायनाच्या हेनान येथील शाखेकडून खातेधारकांना तुम्ही जमा केलेली रक्कम आता गुंतवणूक असल्याने ती काढता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणावर या बँकेच्या विरोधात निदर्शने होत आहेत. बँकेबाहेर मोठय़ा संख्येत निदर्शक एकवटले आहेत. या बँकेच्या बाहेर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने रस्त्यांवर रणगाडे तैनात केले आहेत. त्यांचा उद्देश बँकेला सुरक्षा प्रदान करणे असल्याचे सांगण्यात येते. बँकेने यापूर्वी 15 जुलैपर्यंत रक्कम देणार असल्याचे लोकांना कळविले होते. बँक ऑफ चायना ही चीनमधील मध्यवर्ती बँक असून तिच्या निर्णयानंतर देशात आतापर्यंतची सर्वात मोठी निदर्शने होत आहेत.