Tarun Bharat

राजकीय पक्षांचे लक्ष्य ‘युथ ते बुथ’ !

कोल्हापूर; कृष्णात चौगुले
आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीबरोबरच 2024 मधील लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये यश संपादन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी संघटनात्मक बांधणीकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बुथ बांधणीचे काम युद्ध पातळीवर सुरु असून सर्वसामान्य जनतेला पक्षाशी जोडले जात आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून सरकारने केलेल्या विकासकामांचा, योजनांचा लेखाजोखा मांडला जात आहे. तर विरोधी बाकावर बसलेल्या भाजपकडून आपल्या पक्षाची धोरणे लोकांपर्यंत पोहाचवत असताना गेल्या अडीच वर्षाच्या काळातील सत्ताधाऱयांच्या उणिवा व दोष जनतेसमोर मांडल्या जात आहेत. ‘गाव तेथे बुथ’ आणि ‘घर तिथे कार्यकर्ता’ ही संकल्पना सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदारपणे राबविली जात आहे.

सध्या मतदार यादीतील चित्र पाहता युवा व तरुण मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या युवा शक्तीचा कल निवडणुकीच्या मैदानातील ज्या पक्षाच्या अगर उमेदवाराच्या बाजूने असणार त्या बाजूचा विजय निश्चित होणार आहे. परिणामी आगामी निवडणुकांमध्ये युवा मतदार हा किंगमेकर ठरणार असून राजकारण्यांनीही त्यांना टार्गेट केले आहे. इच्छुक उमेदवार व राजकीय नेत्यांनी आपल्या पाठीशी युवकांची फळी उभा करण्यासाठी सुरुवातीपासूनच जोरदार प्रयत्न केले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हायटेक प्रचार यंत्रणेसाठी युवक आवश्यक असल्यामुळे त्यांचे स्थान अतिशय महत्वाचे बनले आहे. महिला मतदारांचे प्रमाण देखील पुरुष मतदारांच्या तुलनेत किरकोळ फरक वगळता बरोबरीतच आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये महिला कार्यकर्त्यांनाही अनन्य साधारण महत्व दिले जात आहे.

ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांचा मेळ घालून पक्षाचे काम सर्व समाज घटकांपर्यंत पोहोवण्यासाठी जिह्यातील राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भविष्यात गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत आणि जिह्यापासून राज्यपातळीपर्यंत सक्षम नेतृत्व मिळावे, नवीन खंबीर नेतृत्व उदयास यावे यासाठी युवकांना संधी दिली जात आहे. युवकांच्या हातामध्ये नेतृत्व दिले तरच पक्षाचे विचार शेवटच्या समाज घटकापर्यंत पोहोचतील याची त्यांना जाणीव असल्यामुळे बुथ बांधणीची जबाबदारी युवकांवर सोपवली आहे. थेट तळागाळातील जनतेशी नाळ जोडून त्यांच्यापर्यंत पक्षाचे विचार, ध्येय-धोरणे पोहोचवलीत तरच आगामी काळात सत्तेची फळे चाखायला मिळतील, याची राजकारण्यांना जाणिव आहे. त्यामुळे बुथ बांधणीतून सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचून त्यांना आपल्या पक्षाची भूमिका कशी योग्य आहे, आणि विरोधकांची धोरणे कशी समाजहितविरोधी आहेत हे पटवून दिले जात आहे.

युवक प्रदेशाध्यक्ष ते बुथ समन्वयक

बुथ बांधणीमध्ये सर्वसाधारणपणे युवक प्रदेशाध्यक्ष ते बुथ समन्वयक अशी रचना आहे. प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली युवक प्रदेशाध्यक्षांकडे राज्यातील बुथ बांधणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील चित्र पाहता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 2024 ची लोकसभा, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटना बांधणी सुरु केली आहे. युवक प्रदेशाध्यक्ष, विभागीय समन्वयक, जिल्हा समन्वयक, जिल्हा संघटक, विधानसभा समन्वयक, तालुका भाग समन्वयक, ग्रामसमन्वयक व बुथ समन्वयक अशी रचना केली आहे. काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या बुथ बांधणीमध्ये अशीच उतरंड आहे. तर भाजपमध्ये समन्वयक ऐवजी विस्तारक असे संबोधले जाते. पण काम याच पद्धतीने सुरु आहे.


सर्वच पक्षांकडून संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष


पक्षाचा एखादा कार्यक्रम असला की कार्यालयामध्ये येणारे 5-50 कार्यकर्ते म्हणजे पक्ष नव्हे. तर जिह्यातील प्रत्येक गावात, शहरातील प्रत्येक वॉर्डात आणि घराघरात आपला कार्यकर्ता असावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना हे चार पक्ष सध्या आघाडीवर आहेत. बुथ बांधणीमध्ये युवक, युवती, महिला, मागासवर्गीय, विद्यार्थी अशा सर्वच स्तरातील सदस्यांचा समावेश करून सर्वसमावेशक बुथ बांधणीवर विशेष भर दिला जात आहे.


गत निवडणुकांतील पराभवाची कारणमिमांसा


गत जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षातील अनेक उमेदवारांचा काठावरचा पराभव झाला. त्यामुळे याची कारणमिमांसा करून आगामी निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी काय केले पाहिजे ? याचा काही राजकीय पक्षांकडून सध्या गोपनीय पातळीवर सर्व्हे सुरु आहे. ही जबाबदारी युवा पदाधिकाऱयांवर सोपवली आहे. यामध्ये प्रत्येक समाजघटकांपर्यंत पोहोचून त्यांना आपल्या पक्षाकडून आणखी काय करायला हवे, गतपंचवार्षिक निवडणुकीत आपल्या उमेदवारचा पराभव का झाला, संभाव्य उमेदवार मेरीटमध्ये येण्यासाठी आणखी काय करायला हवे ? याबाबत विचारणा केली जात आहे. हा सर्व्हे प्रदेश कार्यालयाकडे पाठविला जाणार असून त्यानंतर संबंधित मतदारसंघात काय केले पाहिजे याची व्यूहरचना केली जाणार आहे.

Related Stories

पुलाची शिरोली कार्यालयाला अखेर मिळाला कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता

Archana Banage

जनआशीर्वाद यात्रेत राजनाथ सिंह यांचा नारायण राणेंना फोन, म्हणाले…

Archana Banage

मोदी सरकारने कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचविल्या

datta jadhav

महाराष्ट्रात 2,585 नवीन कोरोनाबाधित; 40 मृत्यू

Tousif Mujawar

सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदतीसाठी पुढे यावे : बाळासाहेब पाटील

Archana Banage

‘पुरवठा’कडील समायोजित कर्मचाऱ्यांना ‘महसूल’कडे वर्ग करावे

Archana Banage