तरुणभारत ऑनलाइन टीम
राज्याच्या राजकारणात हिंदुत्वावरून भाजप व शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाला असताना भंडारा जिल्हापरिषदेत मात्र काँग्रेस आणि भाजपची युती झाली आहे. राज्यात रोज ह्या ना त्या कारणावरून महाविकास आघाडीचे नेते भाजपच्या नेत्यांचे उणे -दुणे, तर भाजपकडून देखील त्याच पद्धतीने राजकारण सुरु आहे. राज्यात हे चित्र एकीकडे असताना भंडाऱ्यात मात्र भाजपने काँग्रेसच्या गळ्यात गळे घातले आहेत. भाजपच्या बंडखोरांनी बळ देऊन काँग्रेसला अध्यक्ष पद दिले. तर गोंदियात सत्तेसाठी आवश्यक जादूई आकडा जवळ असतानाही भाजपने राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद दिले. या नव्या युतीने राष्ट्रवादीला गोंदिया जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच सत्तेत बसण्याची संधी मिळाली.मात्र भाजपचा एक गट तटस्थ राहिला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मध्यस्थी?
भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष असला तरी त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नव्हते. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून देगलूर व कोल्हापूर या ठिकाणी महाविकास आघाडीने दाखवलेल्या एकजुटीमुळे विजय निश्चित,असे गृहीत धाडरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार, असा विश्वास व्यक्त होत होता. पण, पंचायत समिती निवडणुकीतील दगाबाजीचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीचा वचपा काढला. राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी आखली गेली. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील पाच आणि एक अपक्ष असे सहा सदस्यही सोबत घेतले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मध्यस्थाची भूमिका निभावत विजयासाठी २७ चा जादूई आकडा जुळवून आणला. काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे अध्यक्ष तर वाघमारे यांच्या गटातील संदीप ताले उपाध्यक्ष झाले. मुळात २०१९च्या विधानसभा निवडणुकीत वाघमारे याना भाजपने उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. अलीकडेच मोहाडी नगरपंचायत निवडणुकीतही पक्षाकडून त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न झाला. तुमसर पंचायत समिती सभापती निवडणुकीतही हाच प्रयोग झाल्याचे समजताच त्यांनी काँग्रेसला साथ दिल्याची चर्चा आहे.
तर दुसरीकडे गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपचे २६ सदस्य असल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ एका सदस्याची गरज होती. निवडणुकीपूर्वीच दोन अपक्षांनी पाठिंबा जाहीर केल्याने ही अडचण मिटली. तरीही चाबी संघटना आणि राष्ट्रवादीही भाजपच्या सोबतीला उभे राहिले. भाजपनेही निणुकीपूर्वीच्या सूत्रानुसार राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद दिले.
भाजपची वाघमारे यांच्यावर कारवाई..
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी कार्यवाही केल्यावरून भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांना पक्षातून नि:ष्कासित करण्यात आले आहे. तुमसर शहर, ग्रामीण आणि मोहाडी तालुका कार्यकारणीही त्वरित बरखास्त करण्यात आली आहे. या कार्यकारिणी नव्याने गठीत करण्यात येणार असल्याचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सायंकाळी जाहीर केले.
काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद, भाजपमध्येही आजी-माजी आमदार आमनेसामने
भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात वाद पेटला आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसशी युती न करता भाजपसोबत हातमिळवणी करत पंचायत समीत्यांवर सत्ता काबीज केली आहे. यामुळे भाजपला सुवर्ण संधी असली तरी भाजपमध्येही आमदार परिणय फुके आणि माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटात अध्यक्षपदासाठी चढाओठ सुरु झाली आहे. पक्षातील अंतर्गत वाद पाहता अध्यक्षपद आपल्या हातून जाऊ नये यासाठी भाजपने आमदार चंद्रशेखर बावनकुळेंची निवडणूक निरीक्षकपदी निवड केली आहे.
भंडारा जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाकडे किती जागा?
एकूण : 52 जागा
काँग्रेस : 21 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस : 13 जागा
भाजप : 12 जागा
शिवसेना : 01 जागा
बसपा : 01 जागा
वंचित : 01 जागा
अपक्ष : 03 जागा