दोघांमध्ये चर्चा सुरुः 31 मार्चच्या आत व्यवहार अपेक्षीत
बेंगळूर : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा उद्योग समूह कंत्राट आधारीत आयफोन निर्मिती कंपनी विस्ट्रॉन खरेदी करण्याचा विचार करते आहे. या संदर्भातल्या चर्चेला वेग आला आहे. बेंगळूरमधील विस्ट्रॉनचा निर्मिती कारखाना ताब्यात घेण्यासाठी टाटा समूहाचा प्रयत्न असणार असून यासंदर्भातला करार 31 मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्मयता सांगितली जात आहे.
असे झाल्यास नव्या आर्थिक वर्षापासून टाटा समूहाला आयफोन निर्मिती कारखान्याचा ताबा प्रत्यक्षपणे घेता येऊ शकणार आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये भागीदारी संदर्भात चर्चा सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. याअंतर्गत टाटा उद्योग समूह संयुक्त उद्योगाची प्रमुख भागीदारी घेऊ शकतो. विस्ट्रॉनच्या माध्यमातून मुख्य निर्मिती प्रक्रियेची जबाबदारी पाहू शकतो, असेही म्हटले जात आहे. या अंतर्गत टाटा समूहाला केंद्र सरकारच्या पीएलआय सवलतीच्या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
गुगलही येणार भारतात
याचदरम्यान अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी गुगलही भारतामध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. पिक्सेल मोबाईल फोनच्या असेंब्लींगसाठी कंपनी भारतात येण्याचा विचार करते आहे, असेही समजते. यासंदर्भात गुगलच्या अधिकाऱयांनी येथील सरकारी अधिकाऱयांशी चर्चा केली असल्याचेही सांगितले जात आहे. गुगल भारतामध्ये पिक्सेल फोनची असेंल्बींगचे कार्य करणार असून फोनच्या निर्यातीवरच त्यांचा अधिक भर असणार असल्याचे समजते.