खासदार प्रकाश जावडेकर पहिले पुष्प गुंफणार : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
ब्राम्हण सभा करवीर व श्री महालक्ष्मी को-ऑप बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 22 व्या ‘तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेला’ प्रायव्हेट हायस्कूलमध्ये सोमवार 28 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. सायंकाळी 6 वाजता माजी कॅबिनेट मंत्री, खासदार प्रकाश जावडेकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत. ‘मोदी @ 21′ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक उपस्थित राहणार आहेत. 4 डिसेंबरपर्यंत दररोज सायंकाळी 6 अनेक मान्यवर विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत श्री महालक्ष्मी को-ऑप बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर यांनी दिली.
डिग्रजकर म्हणाले, मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी मधुकर पाटील ‘जगावे छत्रपती शिवरायांसारखे, लढावे छत्रपती शंभूराजांसारखे’ या विषयावर मार्गदर्शन करतील. बुधवार 30 नोव्हेंबर रोजी मुंबईतील दीपाली केळकर ‘हास्यसंजीवनी’ या विषयावर मार्गदर्शन करतील. गुरूवार 1 डिसेंबर रोजी पुण्यातील चंद्रकांत पागे ‘विचारांची मानसशास्त्रीय स्पंदने आणि आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन करतील. शुक्रवार 2 डिसेंबर रोजी पुण्यातील एअर व्हाईसमार्शलचे एव्हीएम किरण पळसुले ‘देशाच्या संरक्षणासाठी सामान्य माणसाची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करतील. शनिवार 3 डिसेंबर रोजी मुंबईतील अभिनेते विघ्नेश जोशी ‘मराठी असे आमुची मायबोली’ या विषयावर मार्गदर्शन करतील. रविवार 4 डिसेंबर रोजी दिल्ली भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांच्या ‘पूर्वांचलमधील हिंदू संस्कृती’ या व्याख्यानाने तात्यासाहेब तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेची सांगता होणार आहे. ब्राम्हण सभेच्या वृषाली कुलकर्णी व्याख्यानमाला प्रमुख आहेत. तरी जास्तीत जास्त कोल्हापूरकरांनी 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत दररोज सायंकाळी 6 वाजता प्रायव्हेट हायस्कूलमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी ब्राम्हण सभेचे अध्यक्ष अॅड. विवेक शुक्ल, कार्यवाह श्रीकांत लिमये, कृष्णा काशिद, अनुराग गोसावी, प्रकाश सांगलीकर, रवि शिराळकर आदी उपस्थित होते.