लव्हर अल्बमसाठी 1 दशलक्ष डॉलर्सचा खटला
अमेरिकन गायिका आणि गीतकार टेलर स्विफ्टच्या चाहत्यांना धक्का देणारे वृत्त आहे. टेलर स्विफ्टवर गाणेचोरीसारखा गंभीर आरोप झाला आहे. टेलर स्विफ्टने स्वतःचा अत्यंत लोकप्रिय अल्बम ‘लव्हर’मध्ये गायिलेले गाणे हे चोरीचे असल्याचा आरोप एका लेखिकेने केला आहे. याचबरोबर या लेखिकेने गायिकेवर 1 दशलक्ष डॉलर्सच्या म्हणजेच 8 कोटी रुपयांच्या भरपाईचा खटला भरला आहे.
टेलर स्विफ्टने 2019 मध्ये ‘लव्हर’ अल्बम प्रदर्शित केला होता. तिचे जगभरात कोटय़वधी चाहते आहेत. टेलर स्विफ्टवर प्लेगरिजम म्हणजेच साहित्यचोरीचा आरोप झाला आहे. 2010 मध्ये प्रकाशित पुस्तकातील कविता, कथा अन् छायाचित्रे चोरून गायिकेने स्वतःच्या अल्बमसाठी गाणी तयार केली असल्याचा आरोप लेखिका टेरेसा ला डार्ट यांनी केला आहे.


टेरेसा ला डार्ट यांच्याकडून 1 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिकच्या भरपाईसाठी खटला दाखल करण्यात आला आहे. टेरेसा यांनी अमेरिकेतील टेनेसी येथील एका संघीय न्यायालयात याबाबत अर्ज केला आहे.
11 ग्रॅमी पुरस्कारांची विजेती
दुसरीकडे टेलर स्विफ्टने साहित्यचोरीचा आरोप फेटाळला आहे. पेन्सिलवेनियात जन्मलेली टेलर स्विफ्ट वयाच्या 14 व्या वर्षांपासून गायनक्षेत्रात कार्यरत आहे. आतापर्यंत तिने 11 ग्रॅमी पुरस्कार मिळविले आहेत. तिच्या नावावर एक एमी पुस्कार, 34 अमेरिकन म्युझिक अवॉर्ड, 29 बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड आणि 58 गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंद आहेत.