प्रतिनिधी /बेळगाव
केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन (काहेर) तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुदुच्चेरी येथील जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन, मेडिकल एज्युकेशन ऍण्ड रिसर्चचे संचालक डॉ. राकेश अग्रवाल उपस्थित होते.
यावेळी डॉ. अग्रवाल म्हणाले, ‘काहेर हे आरोग्य विज्ञान विद्यापीठ असल्याने शिक्षकांची भूमिका केवळ शिकविण्यापुरती मर्यादित नसून रुग्णसेवा हा मुख्य उद्देश आहे. जे. एन. मेडिकल कॉलेजच्या विकासामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षकांनी आधुनिक अध्यापन पद्धतींचा वापर करावा,’ असे त्यांनी नमूद केले.
काहेरचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी म्हणाले, ‘देशात शिक्षकांना मोठा आदर आहे. डॉ. एस. राधाकृष्णन यासारख्या थोर व्यक्तीच्या नावे हा दिवस साजरा होतो’. डॉ. एम. बी. बेल्लद, डॉ. एम. एस. गणाचारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ. महंतशेट्टी यांनी परिचय करून दिला. डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांनी स्वागत केले. डॉ. ज्योती नागमोती यांनी आभार मानले.