डीआर प्रमाणे टीआर उपाधी लावण्यास मिळणार : शिक्षणमंत्र्यांचा पाठिंबा
कोल्हापूर प्रतिनिधी
डॉक्टरला (Dr),कॅप्टनला(Capt) ,न्यायाधीश(Justice) यांच्या नावामागे उपाधी लावता येते. त्याच प्रमाणे आता शिक्षकांनाही Tr For Teacher उपाधी आपल्या नावामागे लावता येणार आहे.रत्नागिरी येथे पार झालेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या 17व्या अधिवेशनात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षकांना टीआर अशी उपाधी लावण्यासंदर्भातील उपक्रमाला पाठिंबा व्यक्त केला.
डॉक्टर ,कॅप्टन, न्यायाधीश यांच्या नावामागे ज्याप्रमाणे त्यांच्या व्यवसायाला साजेशी उपाधी लावली जाते, त्याचप्रमाणे शिक्षकांच्याही नावामागे सन्मानाने Tr For Teacher ही उपाधी लावली जावी, यासाठी नवनीतने हा उपक्रम हाती घेतला होता. शिक्षण हा सर्वांत उदात्त आणि नि:स्वार्थ व्यवसायांपैकी एक आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी निरपेक्ष वृत्तीने अविरत झटणारे, महत्त्वपूर्ण योगदान देणारे; डॉक्टर, इंजिनिअर, न्यायाधीश यांना घडविणारे शिक्षक मात्र दुर्लक्षित राहतात, अशी भावना व्यक्त करण्यात आली होती. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षकांना त्यांच्या नावामागे ‘Tr‘ लिहिण्याची परवानगी देण्याचा सरकार विचार करत आहे. डॉक्टरांच्या वाहनांवर ‘Dr‘ लिहितात.
त्याप्रमाणे शिक्षकांच्या वाहनांवर ‘Tr‘ लिहिण्याची परवानगी लवकरच दिली जाईल, असे सांगितले. नवनीत एज्युकेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक, ज्ञानेश (सुनील) गाला यांनी सांगितले की, शिक्षकांच्या भावनेला अभिवादन करण्याचा आणि त्यांच्या उदात्त व्यवसायाला सलाम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिक्षणमंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला आता खात्री आहे की या उपक्रमाद्वारे इतर अनेकांना या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल.