Tarun Bharat

तंत्रज्ञानाचा फंडा, दहा तोळय़ांचा गंडा!

टिळकवाडीतील सराफी पेढीला भामटय़ाने हातोहात फसविले

प्रतिनिधी /बेळगाव

फोन पे वरून केवळ एक रुपया जमा करून एका भामटय़ाने सराफी पेढीतून दहा तोळय़ांहून अधिक सोन्याचे दागिने खरेदी करून तेथून पोबारा केल्याची घटना टिळकवाडी परिसरात घडली आहे. या घटनेने सराफी व्यावसायिकांत एकच खळबळ माजली असून टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

 तंत्रज्ञानाच्या आड हातचलाखी करून सराफी पेढीला ठकविणारा भामटा जत, जि. सांगली येथील असून पॅनकार्ड व त्याने दिलेल्या कोऱया धनादेशावरून पोलीस त्याचा माग काढण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा भामटय़ांपासून सराफी व्यावसायिकांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

सोमवार दि. 13 जून रोजी दुपारी 3 ते 6 यावेळेत ही घटना घडली आहे. उपलब्ध माहितीनुसार रणधीर राजेंद भोसले, रा. जत, जि. सांगली या भामटय़ाने ही करामत केली आहे. सोमवारी रात्री 9 पासून त्याचा मोबाईलही स्वीच ऑफ आहे. तोपर्यंत सराफी पेढीतील कर्मचाऱयांना ‘थोडय़ा वेळेत पैसे जमा होतात’, असा विश्वास तो देत होता. पैसे जमा करण्यासाठी कर्मचाऱयांनी तगादा लावताच रात्रीपासून त्याचा फोन स्वीच ऑफ झाला.

सोमवार दि. 13 रोजी दुपारी 3 वाजता एक तरुण सराफी पेढीत शिरला. त्याने 5 लाख 71 हजार 577 रुपये किमतीचे सुमारे दहा तोळय़ांहून अधिक दागिने खरेदी केले. रक्कम फोन पे ने जमा करणार असल्याचे त्याने सांगितले. सुरुवातीला केवळ एक रुपया जमा केला. खात्रीसाठी एक धनादेश आणि पॅनकार्ड पेढीकडे जमा केले. थोडय़ा वेळात संपूर्ण रक्कम जमा होणार, असे त्याने सांगितले होते.

सुरुवातीला ही हातचलाखी सराफी पेढीतील कर्मचाऱयांच्याही लक्षात आली नाही. सायंकाळी 6 वा. हा भामटा तेथून निघून गेल्यानंतरही पैसे जमा झाले नाहीत. कर्मचाऱयांनी रणधीरने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. सुरुवातीला तो शांतपणे उत्तर देत होता. थोडय़ा वेळात पूर्ण पैसे जमा होतील, असे सांगत होता. रात्री 9 नंतर त्याचा फोनही बंद झाला. टिळकवाडी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

Related Stories

अधिकाऱ्यांची घाईगडबड-बदलीची तडफड

Amit Kulkarni

भू-संपादन लवादाची जबाबदारी जिल्हाधिकाऱयांवर सोपवा

Amit Kulkarni

बेळगाव-सांबरा रस्ता होणार सहा किंवा चौपदरी

Rohit Salunke

खानापुरातील मराठी शाळांची स्थिती चिंताजनक

Amit Kulkarni

हुतात्म्यांचे बलिदान वाया जाणार नाही

Amit Kulkarni

गो-हत्या बंदी कायदा मंजूर झाल्याचा खानापुरात आनंदोत्सव

Patil_p