नवी दिल्ली : देशातील इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना चालना देण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये सुधारणेसह अन्य प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याची बाब निती अयोगाने व्यक्त केली आहे. यासंदर्भात एक विस्तृत असा विश्लेषणात्मक अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
प्राप्त अहवालानुसार इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांनी सकारात्मक कल नोंदवला आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकही इलेक्ट्रिक दुचाकीचा पर्याय विचारात घेत आहेत. यामुळे आगामी काळातही ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणार असून पर्यावरणासंबंधीत जागरुकता वाढत जाणार आहे. याचा फायदा पुढील काळात होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
चार्जिंग केंद्रांवर भर हवा
इलेक्ट्रिक दुचाकींना प्रोत्साहन देण्यासाठी उच्च दर्जाची बॅटरी व अन्य साधनांचा वापर यामध्ये करण्याची गरज आहे. या सर्व बाबी इलेक्ट्रिक वाहनांच्या उपकरणांच्या आयातीवर निश्चित होतात. यामुळे उत्पादन क्षमता व प्रोत्साहन वाढविण्याची गरज असून सुरुवातीच्या काळात मोठय़ा प्रमाणात चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची आवश्यकता असल्याचे आयोगाने म्हटले आहे.