बिहार राज्याच्या भागलपूर शहरात एक युवक असा आहे की जो दातांनी नारळ सोलू शकतो. एक नारळ सोलण्यासाठी त्याला अवघ्या 20 ते 22 सेकंदाचा अवधी लागतो. त्याचे लोखंडासारखे घट्ट दात आणि हिरडय़ा यांची पंचक्रोशीत चर्चा आहे. त्याच्या या सामर्थ्यामुळे त्याला लोहासिंग असे उपनाम मिळालेले आहे.
त्याचे खरे नाव अंकीत असे असून तो मूळचा भागलपूरनजीकच्या नवगिछया या खेडय़ाचा रहिवासी आहे. त्याचे दात आणि जबडा यांची ताकत अचाट आहे. 25 वर्षाच्या या युवकाला प्रारंभी आपल्या दातातील या सामर्थ्याची कल्पना नव्हती. पण पाच वर्षापूर्वी एकदा लोखंडी शस्त्राने नारळ सोलताना त्याचे बोट कापले गेले. त्यामुळे सहज म्हणून त्याने नारळ तोंडाने सोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला त्याचा जबडा आणि दात यांच्यातल्या शक्तीची कल्पना आली. पहिल्याच प्रयत्नात त्याने अर्ध्या मिनिटात एक असोला नारळ पूर्णतः सोलून काढला. एवढे करूनही त्याला कोणताही त्रास झाला नाही. त्यामुळे पुढे तो दातानेच नारळ सोलू लागला. यासाठी त्याने विशिष्ट प्रकारे सरावही केला आहे पण केवळ सराव करून दातांनी नारळ सोलणे शक्य नसते. त्यासाठी जबडय़ात शक्ती असणे फार महत्त्वाचे आहे. ही शक्ती त्याला नैसर्गिकरित्याच मिळालेली आहे असे तज्ञांचे मत आहे. हा त्याचा असामान्य गुणर्धम असून सर्वसामान्य व्यक्तीचे दात इतके बळकट असू शकत नाहीत. नारळ सोलण्यासाठी जबडय़ाचा आकारही मोठा असावा लागतो. ही देणगी त्याला निसर्गतः लाभलेली आहे. परिणामी त्याला हे काम शक्य होते.
अंकीतची आई मात्र मुलाच्या या क्षमतेमुळे सतत चिंतेत असते. नारळ सोलून सोलून मुलाचे दात सुटतील अशी धास्ती तिला वाटते. अंकीतला 20-25 सेकंदात सुका नारळ दाताने सोलून त्यावरील कवच काढून टाकताना बघणारे लोक आश्चर्य चकित होतात. दातांनी नारळ सोलण्याचे हे कौशल्य आणि शक्ती मोठय़ा व्यासपीठावर प्रदर्शित करण्याची अंकीतची इच्छा आहे. यासाठी त्याने काही संस्थांकडे संपर्क केलेला आहे. मात्र आतापर्यंत तशी संधी मिळालेली नाही. सध्या तो पदवीचे शिक्षण घेत असून दातांनी नारळ सोलण्याचे काम त्याने एक छंद म्हणून स्वीकारलेले आहे. शिक्षण संपल्यानंतर सरकारी नोकरी मिळावी अशी त्याची इच्छा असावी. दातांनी नारळ सोलण्याचा पराक्रम नोकरी मिळविण्यासाठी उपयोग पडेल अशी त्याची भावना आहे. त्याच्या सामर्थ्याची प्रशंसा सर्वत्र होत आहे.