दोन लाखाची लाच घेताना दोघांना अटक
बेळगाव : शेतजमिनीच्या खातेबदलासाठी 2 लाख रुपयांची लाच घेताना कित्तूरच्या तहसीलदारांसह दोघा जणांना लोकायुक्त अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले आहे. शुक्रवारी रात्री तहसीलदारांच्या निवासस्थानी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
कित्तूरचे तहसीलदार सोमलिंगाप्पा हलगी व तहसीलदार कार्यालयातील भूसुधारणा विभागाचे अधिकारी प्रसन्न जी. यांनी एका शेतकऱयाकडून 5 लाख रुपये लाच मागितली होती. यासंबंधी राजेंद्र बापुसाहेब इनामदार (रा. खोदानपूर) यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती.
लोकायुक्त पोलीसप्रमुख यशोदा वंटगोडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अन्नपूर्णा हुलगूर व त्यांच्या सहकाऱयांनी तहसीलदारांसह दोघा जणांना लाच घेताना पकडले.
10 एकर जमिनीची नोंद करून घेण्यासाठी हमी म्हणून 20 लाखांचा धनादेश मागण्यात आला होता. या कामासाठी 5 लाख रुपये लाच मागितली होती. शुक्रवारी रात्री तहसीलदारांच्या निवासस्थानी लाच घेताना अचानक छापा टाकून दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.