वार्ताहर/ एकंबे
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे पुत्र तेजस शिंदे यांनी सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने यांच्याकडे राजीनामा पत्र सुपूर्द केले आहे. गेली पाच वर्षे ते या पदावर कार्यरत होते.
तेजस शिंदे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सातारा जिह्यातील सक्रिय राजकारणामध्ये सहभागी झाले होते. अल्पावधीतच त्यांच्यावर नोव्हेंबर 2017 मध्ये जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी या पदाच्या माध्यमातून जिह्यातील युवकांना पक्षाच्या प्रवाहात आणले. संपूर्ण जिह्यात त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विस्तार केला. केंद्र सरकारच्या विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेच्या विरोधात त्यांनी सातत्याने आंदोलने केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या एस. टी. बसेसच्या मागणीसाठी त्यांनी जिह्यात अनेक ठिकाणी आंदोलने केली. अतिवृष्टीच्या कालावधीत पाटण, वाई, महाबळेश्वर आणि जावली सारख्या दुर्गम तालुक्यांमध्ये स्वतः जाऊन त्यांनी मदतकार्य केले. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील केला.
पाच वर्षांचा आपला कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आता युवक कार्यकर्त्याला संधी देण्याच्या हेतूने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.