वृत्तसंस्था/ बोस्टन
राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक मिळविलेला ऍथलीट तेजस्विन शंकरने माजी वर्ल्ड चॅम्पियनला हरवून न्यू बॅलन्स इनडोअर ग्रां प्रि 2023 मधील स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडीचे सुवर्णपदक मिळविले.
वर्ल्ड ऍथलेटिक्स इनडोअर टूर गोल्ड मालिकेतील या स्पर्धेत तेजस्विन शंकरने 2.26 मी. उंच उडी घेत पहिले स्थान मिळविले. बहामाच्या 38 वर्षीय डोनाल्ड थॉमसला मागे टाकत त्याने हे यश मिळविले. थॉमस हा 2007 मधील वर्ल्ड चॅम्पियन आहे. त्याने 2.23 मी. उंच उडी घेत दुसरे स्थान मिळविले. चारवेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला थॉमस हा 2010 दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णविजेता आहे.
उंच उडीमध्ये फक्त चार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात डॅरील सुलिव्हानचाही समावेश होता. त्याने 2.19 मी. अंतर नोंदवत तिसरे स्थान मिळविले. शंकरने चारही वेळा पहिल्या प्रयत्नातच अनुक्रमे 2.14, 2.19, 2.23 व 2.26 मी. उंच उडी घेतली. अंतिम प्रयत्नात त्याने 2.30 मी. चा नवीन राष्ट्रीय इनडोअर विक्रम नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आले नाही. त्याने 2018 मध्ये 2.28 मी. चा राष्ट्रीय इनडोअर विक्रम नोंदवला आहे. याशिवाय त्याच्या नावावर पुरुषांच्या उंच उडीमधील राष्ट्रीय विक्रमही नोंद झाला आहे. त्याने 2.29 मीटर्सचा हा विक्रम केला आहे. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विन शंकरने 2.22 मी. अंतर नोंदवत कांस्यपदक मिळविले होते. राष्ट्रकुलमधील भारताचे या क्रीडा प्रकारातील हे पहिलेच पदक होते.