वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बर्मिंगहममध्ये होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा अव्वल ऍथलिट तेजिंदरपाल सिंग तूर दुखापतीमुळे सहभागी होऊ शकणार नाही. सध्या युगेनी येथे सुरु असलेल्या विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेतून त्याला या स्नायू दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे.
4 दिवसांपूर्वी अमेरिकेतील या स्पर्धेसाठी सराव करताना त्याची धोंडशिर दुखावली गेली. या दुखापतीवर वैद्यकिय इलाज सुरु असतानाही त्याला सातत्याने वेदना जाणवू लागल्या. ही दुखापत बरी होण्यास काही कालावधी लागणार असल्याने त्याने विश्व ऍथलेटिक्स स्पर्धा तसेच आगामी बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. आगामी राष्ट्रकुल स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार असून घोषित करण्यात आलेल्या भारताच्या 36 जणांच्या चमूमध्ये तूरचा समावेश होता. तो पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात सहभागी होणार होता.