Tarun Bharat

तेलंगणा पोलिसांचे 4 राज्यांमध्ये छापे

आमदारांना 100 कोटींच्या आमिषाचे प्रकरण ः धर्मगुरुसह 3 जणांना अटक

वृत्तसंस्था  / हैदराबाद

तेलंगणातील 4 आमदारांना 100 कोटी रुपयांचे आमिष दाखविल्याप्रकरणी राज्य पोलिसांनी 4 राज्यांमधील 7 ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन विशेष तपास पथकाने (एसआयटी) हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणात कारवाई केली आहे.

एसआयटीने याप्रकरणी 3 आरोपींना अटक केली आहे. यात हरियाणाच्या फरीदाबाद येथील धर्मगुरु रामचंद्र भारती, हैदराबाद येथील व्यावसायिक नंद कुमार आणि तिरुपती येथील सिम्हाजी स्वामी सामील आहेत. याचबरोबर केरळच्या कोची येथील डॉ. जग्गू यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे.

धर्मगुरु रामचंद्र भारती यांच्या फरीदाबादसह कर्नाटकातील पुत्तूर येथील घरावर छापा टाकण्यात आला.  याचबरोबर तिरुपतीमध्ये सिम्हाजी स्वामी यांच्या घराचीही झडती घेतली गेली आहे. एसआयटीने हैदराबादच्या जुबली हिल्स भागात व्यावसायिक नंदकुमार यांच्या घरी तसेच रेस्टॉरंटवरही छापे टाकण्यात आले आहेत.

डॉ. जग्गू हेच रामचंद्र भारती आणि एक अन्य संशयित तुषार यांच्यात समन्वय साधून होते. डॉ. जग्गू अन् तुषार यांना आताच अटक केली जाऊ शकत नाही. तुषारनेच आमदार रोहित रेड्डी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. एका आमदाराचे नातेवाईक असलेले श्रीनिवास यांनी सिम्हाजी स्वामी यांच्यासाठी तिरुपतीहून हैदराबादसाठी फ्लाइटचे तिकीट बुक केले होते अशी माहिती एटीएसच्या एका अधिकाऱयाने दिली आहे.

मागील महिन्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपवर आमदारांना 100 कोटी रुपयांचे आमिष दाखविल्याचा आरोप केला होता. दिल्लीचे दलाल आमच्या आमदारांना लाच देऊन खरेदी करण्याचे काम करत आहेत. तेलंगणातील एका फार्महाउसमध्ये आमच्या पक्षाच्या 4 आमदारांना 100 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. परंतु केसीआरचे आमदार विकले जाणारे नाहीत असे राव यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी कथित ऑपरेशन कमळसंबंधी पोलिसांना माहिती दिली होती.

या घटनेनंतर तेलंगणा सरकारने राज्यात सीबीआयला चौकशीसाठी दिलेली अनुमती मागे घेतली आहे. यंत्रणेला आता राज्यात कुठल्याही प्रकारच्या चौकशीसाठी राज्य सरकारची अनुमती घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Related Stories

बिहारचे डीजीपी संतप्त, कर्मचाऱयांना अपशब्द

Patil_p

अटी आणि शर्थींसह सार्वजनिक वाहतूक लवकरच सुरू होईल : नितीन गडकरी

Tousif Mujawar

बुलेट ट्रेन प्रकल्पाकरता 1500 कोटींची तरतूद

Patil_p

मध्यप्रदेशातील चर्चला लागली आग

Patil_p

पुद्दुचेरीत 26 मार्चपर्यंत ‘शाळा बंद’ची घोषणा

Patil_p

वर्ल्ड बँकेकडून भारताला एक अब्ज डॉलरचा निधी

prashant_c
error: Content is protected !!