मुलीला डॉक्टर करण्याचे वडिलांचे स्वप्न : मोदींचे डोळे पाणावले
वृत्तसंस्था /भरुच
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातच्या भरूचमध्ये आयोजित ‘उत्कर्ष समारंभा’त भाग घेतला. त्यांनी यावेळी शासकीय योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधला असता एका दृष्टीहीन लाभार्थीशी बोलताना पंतप्रधान मोदी भावुक झाल्याचे दिसून आले.
शासकीय योजनांच्या लाभार्थींपैकी एक अयूब पटेल नावाच्या व्यक्तीशी पंतप्रधानांनी संवाद साधला. सौदी अरेबियात असताना आयड्रॉप घातल्याने साइट इफेक्ट होत डोळय़ांची दृष्टी हळूहळू गेल्याचे सांगत अयूब यांनी स्वतःच्या मुलीला डॉक्टर करण्याच्या स्वप्नाबद्दल पंतप्रधानांना सांगितले.
मोदींनी अयूब यांच्या मुलीला डॉक्टर का व्हायचे आहे अशी विचारणा केला. यावर वडिलांची स्थिती पाहून हा निर्णय घेतल्याचे तिने सांगितल्यावर मोदींनी तिला मदतीचा प्रस्ताव दिला. तुमच्या मुलींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास मला सांगा असे पंतप्रधानांनी अयूब यांना उद्देशून म्हटले आहे.
या समारंभाचे आयोजन भरूच जिल्ह्य़ात राज्य सरकारच्या चार प्रमुख शासकीय योजनांची 100 टक्के पूर्तता झाल्याने करण्यात आले होते. सरकार प्रामाणिकपणे, एक संकल्प घेऊन लाभार्थीपर्यंत पोहोचल्यास किती सार्थक परिणाम मिळू शकतात याचा पुरावा देणारा हा उत्कर्ष समारंभ असल्याचे मोदींनी म्हटले आहे.