प्रतिनिधी /बेळगाव
श्रावण हा हिंदू वर्षामधील सर्वात पवित्र महिना संबोधला जातो. या महिन्यामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम व सण केले जातात. त्यापैकीच एक असणारा श्रावण सोमवार. प्रत्येक श्रावण सोमवारी भाविक शिवालयांमध्ये जावून दर्शन घेत असतात. बेळगाव शहर व तालुक्मयात अनेक प्राचीन व जागृत शिवालये आहेत. शेवटच्या श्रावण सोमवारी यापैकी काही मंदिरांची माहिती थोडक्मयात देण्याचा प्रयत्न…
कॅम्प येथील शंभू जत्ती मंदिर


बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात शंभू जत्ती (बिस्कीट महादेव) मंदिर आहे. यंदे खूटपासून गणेशपूर रोडवर कॅम्प येथे हे प्राचीन मंदिर आहे. अनेक वर्षांपासून या ठिकाणी महादेवाचे लहानसे मंदिर आहे. बेळगाव परिसरातील हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. महाशिवरात्र व श्रावण सोमवारी शेकडोंच्या संख्येने भाविकांची येथे गर्दी होते. मे 1968 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिराच्या समोरील बाजूला पूर्वी जांबोटकर नामक व्यक्ती बिस्किटे विक्री करत असल्यामुळे कालांतराने या मंदिराला बिस्कीट महादेव असे नाव प्रचलित झाले. या ठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.
नेहरूनगर येथील केएलई शिवालय
वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत ध्यान-धारणा करण्यासाठी केएलई प्रशासनाने नेहरूनगर येथे शिवालय स्थापन केले. सन 1979 मध्ये शिवालयाचे उद्घाटन झाले. शिवलिंगाची पिंडी स्वयंभू असून ती गंगा नदीतून आणण्यात आली आहे. त्या पिंडीवर अनेक आध्यात्मिक रचना दिसून येतात. समोरील बाजूस अर्धचंद्र, मागील बाजूस पिंडी, मध्यावर शंख, एका बाजूला गंगेचे स्वरुप पिंडीवर दिसत असल्यामुळे या शिवालयाला धार्मिक महत्त्व आहे.
केएलई परिसरातील विद्यार्थी या ठिकाणी मनाची एकाग्रता व चिंतन करतात. दररोज सूर्योदयापूर्वी अभिषेक केला जातो. श्रावण व महाशिवरात्रीला मंदिरामध्ये विशेष रुद्राभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम करण्यात येतात. स्वच्छ व सुंदर परिसर असल्यामुळे दररोज शेकडो भाविक दर्शन घेत असतात. मंदिर व्यवस्थापनासाठी वरि÷ डॉक्टरांची कमिटी तयार करण्यात आली असून त्यांच्या मार्फत व्यवस्थापन केले जाते. याच परिसरात 2014 ला मारुती मंदिराची स्थापना करण्यात आली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरवषी मंदिराचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यानिमित्त केएलई म्युझिक स्कूलतर्फे संगीत कार्यक्रम आयोजित केला जातो. याचबरोबर सर्वोत्तम कर्मचारी व विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येतो. केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. व्ही. डी. पाटील यांनी समिती तयार केली आहे. यामध्ये डॉ. निरंजन महांतशेट्टी असून समितीचे कार्याध्यक्ष शिवयोगी हुगार आहेत. मंदिरातील धार्मिक कार्यक्रम व पौरोहित्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली होते.
मुचंडी येथील सिद्धेश्वर मंदिर


बेळगाव परिसरातील जागृत शिवालयांपैकी एक शिवालय मुचंडी येथे आहे. मुचंडी येथील सिद्धेश्वर मंदिर एका डोंगरामध्ये वसले आहे. डोंगराच्या पायथ्याशी हे शिवलिंग असून या भागात बारमाही वाहणारे झरे आहेत. या झऱयांमुळे मुचंडी गावात आजतागायत पाण्याची कमतरता भासलेली नाही. सिद्धेश्वर मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचे असल्याचे स्थानिकांमधून सांगण्यात येते. या ठिकाणी भरणारी इंगळय़ांची यात्रा प्रसिद्ध आहे. हजारोंच्या संख्येने भाविक या इंगळय़ांमधून जावून नवस फेडतात. महाशिवरात्र व श्रावण महिन्यात विशेष पूजेचे आयोजन केले जाते. चौथ्या श्रावण सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या मंदिराबरोबरच काही पायऱया चढून गेल्यानंतर सिद्धेश्वराचे दुसरे मंदिर आहे. तेथून बेळगावचे दिसणारे दृश्य अप्रतिम आहे.
वडगाव येथील मल्लिकार्जुन देवस्थान


चावडी गल्ली, माधवपूर, वडगाव येथे प्राचीन मल्लिकार्जुन देवस्थान हे शिवमंदिर आहे. 1817 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. वडगाव परिसरातील जागृत शिवालय म्हणून मंदिराची ख्याती आहे. महाशिवरात्र, श्रावण सोमवार यासह विविध सण-उत्सवांवेळी मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रावण सोमवारी मंदिरात अभिषेक, भजन, कीर्तनाचे आयोजन केले जाते. महाशिवरात्रीला भजन व पालखी निघते. नवरात्रीत विशेष पूजन केले जाते. वैशिष्टय़ म्हणजे पहाटे 4 ते 6 या वेळेत मंदिर आवारातील बेलाच्या झाडाची महिला भक्तिभावाने पूजा करतात. अमावास्येला महाप्रसादाचे आयोजन केले जात असल्याचे पुजारी नागय्या कांतीमठ यांनी सांगितले.
वीरभदनगर येथील वीरभदेश्वर


शहराच्या उत्तर भागात वीरभदेश्वराचे मंदिर आहे. एका बाजूला शिवाजीनगर तर दुसऱया बाजूला पोलीसलाईन यामध्ये वीरभदेश्वर मंदिर आहे. शंकराचा एक अवतार असा वीरभदेश्वराचा उल्लेख आढळतो. लहान स्वरुपात असणाऱया मंदिराचा 1966 मध्ये जीर्णोद्धार करून मोठे स्वरुप देण्यात आले. त्यामुळे महाशिवरात्र, श्रावण सोमवार याचबरोबर प्रत्येक सोमवारी शेकडो भाविकांची या ठिकाणी रीघ असते. पोलीस क्वॉर्टर्स परिसरात हे मंदिर असल्याने येथे पोलीस व त्यांचे कुटुंबीय यांचे येणे-जाणे अधिक असते. दगडामध्ये कोरीव अशी वीरभदेश्वराची रेखीव मूर्ती आहे. बेळगाव परिसरातील जागृत देवस्थान अशी या मंदिराची ओळख आहे. वीरभद्र मंदिरामुळे आसपासच्या परिसराला वीरभद्रनगर असे नाव पडले.