कडोली येथील गणेश मंदिराची दानपेटी फोडली
वार्ताहर /कडोली
चोरटय़ांनी आता ग्रामीण भागातील मंदिरांना लक्ष्य बनविले आहे. कलमेश्वर गल्ली-कडोली येथील गणेश मंदिराची दानपेटी फोडण्यात आली आहे. हा प्रकार रविवारी रात्री घडला असला तरी सोमवारी 4 वाजण्याच्या सुमारास घटना उघडकीस आली आहे. यामुळे आता मंदिरेही सुरक्षित राहिली नसल्याचे दिसून येत आहे.
कडोली येथील कलमेश्वर मंदिरानजीक असलेल्या गणेश मंदिराची दानपेटी फोडण्यात आली आहे. बस्तवाड येथील जैनबस्तीमधील दानपेटीही फोडण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोमवारी कडोली येथे चोरीचा प्रकारही घडला आहे. सोमवारी नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आली.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी दानपेटीचा कुलूप तोडून सुमारे 30 ते 40 हजार रुपये रक्कम लांबविल्याचे सांगण्यात आले. या चोरीमुळे परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली नाही. आता ग्रामीण भागातील मंदिरांना चोरटय़ांनी लक्ष्य बनविले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बस्तवाड येथे चोऱयांचे सत्र सुरूच : जैनबस्ती फोडून दानपेटी पळविली
बेळगाव : बस्तवाड (ता. बेळगाव) येथे चोऱयांचे सत्र सुरूच आहे. एका रात्रीत दोन मोटारसायकली चोरल्याची घटना ताजी असतानाच चोरटय़ांनी जैनबस्तीचा कडीकोयंडा तोडून दानपेटी पळविली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
विद्यानगर, बस्तवाड येथील जैनबस्तीचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी आत प्रवेश केला आहे. तेथील दानपेटी बाहेर नेऊन फोडण्यात आली आहे. दानपेटीतील रक्कम काढून घेऊन रिकामी पेटी बस्तीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका गवतगंजीत फेकून देण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. गेल्या तीन वर्षांपासून ही दानपेटी उघडण्यात आली नव्हती. सुमारे 40 ते 50 हजार रुपये दानपेटीत असावेत, असा अंदाज आहे. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
दोन दिवसांपूर्वी ट्रक्टरमधील साऊंड सिस्टीम चोरटय़ांनी पळविले आहेत. त्यानंतर रविवारी पहाटे दोन मोटारसायकली पळविल्याची घटना उघडकीस आली होती. सोमवारी जैन बस्तीतील चोरीचा प्रकार सामोरा आला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरटय़ांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.