खड्डे बुजविल्याने नागरिकात समाधान
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ते शाहूनगरपर्यंतच्या रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवून रस्ता वाहतुकीला सुरळीत करण्याचे वृत्त ‘तरुण भारत’मधून प्रसिद्ध होताच ग्रामपंचायतेने रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीला सुरळीत केला. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेलया दोन-तीन वर्षापूर्वी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून सदर रस्त्याचे डांबरीकरण केले होते. त्यानंतर रस्त्याची डागडुजी नसल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरून वाहने चालविणे कसरतीचे बनले होते. अनेकवेळा किरकोळ अपघात होऊन वाहनधारक जखमी होण्याबरोबर वाहनांचेसुद्धा नुकसान झाले आहे. परंतु याकडे लोकप्रतिनिधी व सदस्यांनी दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे सर्वांचीच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी होती. त्याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने रस्त्यावरील खड्डे खडी व मुरुम घालून तात्पुरती दुरुस्ती केली आहे.
रस्ता डांबरीकरणाची मागणी
परंतु सदर खडी थोडय़ाच दिवसात उखडून परत खड्डेमय रस्ता बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता सुरळीत करण्यासाठी खड्डय़ामध्ये डांबर टाकून किंवा क्राँक्रिटीकरण करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्याची मागणी होत आहे.