वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची सर्वांत वेगवान महिला धावपटू आणि 100 मीटर शर्यतीतील विद्यमान राष्ट्रीय विजेती दुती चंदची डोपिंग चाचणी सकारात्मक आल्याने तिला तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईला तोंड द्यावे लागले आहे. मात्र दुतीने तिला असे कोणतेही पत्र मिळाल्याचे नाकारले आहे.
दुती चंदची स्पर्धाबाह्य चाचणीदरम्यान घेण्यात आलेली प्रतिबंधित ऍनाबॉलिक स्टिरॉइड्ससाठाची चाचणी सकारात्मक आली आहे. 5 डिसेंबर रोजी ही चाचणी घेण्यत आली होती. त्यात सिलेक्टिव्ह एंड्रोजन रिसेप्टर मॉडय़ुलेटर्स (एसएआरएम) यासंदर्भात तिची चाचणी सकारात्मक आली आहे. वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सीनुसार, या प्रतिबंध घातलेल्या घटकात स्नायू आणि हाडांमधील एंड्रोजन रिसेप्टर्सला उत्तेजित करण्याची क्षमता असल्यामुळे खेळांमध्ये कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते.
दुतीने सप्टेंबर-ऑक्टोबर, 2022 या कालावधीत झालेल्या गुजरातमधील राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेतला होता. मात्र 200 मीटरच्या शर्यतीत अंतिम फेरीपर्यंत ती पोहोचली नव्हती, तर 100 मीटर शर्यतीत अंतिम फेरीत तिने सहावे स्थान पटकावले होते. 2018 च्या एशियाडमध्ये तिने 100 मीटर आणि 200 मीटर महिलांच्या शर्यतींमध्ये रौप्यपदक तसेच 2013, 2017 आणि 2019 मध्ये आशियाई स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या दुतीच्या नावावर 2021 मध्ये नोंदविलेला 100 मीटर शर्यतीतील राष्ट्रीय विक्रम आहे.
दुतीकडून इन्कार
दुतीला तिच्या ’बी’ नमुन्याची चाचणी करायची आहे आणि जर ती ‘पॉझिटिव्ह’ आली, तर तिला चार वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागू शकते. ‘मी जवळजवळ एक दशकापासून सर्वोच्च स्तरावर शर्यतीत सहभागी होत आले आहे आणि मी कधीही कोणत्याही प्रकारच्या कार्यक्षमता वाढवणाऱया औषधांना स्पर्श केलेला नाही किंवा त्यांचा वापर केलेला नाही. जेव्हा जेव्हा विचारले, तेव्हा मी माझे नमुने दिले आहेत. 2014 मध्ये मला हायपरअँड्रोजेनिझम प्रकरणी माझ्या हक्कासाठी लढावे लागले आणि आता हे समोर आले आहे. माझी पुढची कृती काय असेल हे सांगण्यासाठी मला प्रथम यासंदर्भातील पत्र पहावे लागेल, असे तिने सांगितले आहे.