कर्लीजचा मालक व ड्रग्ज पेडलर यांना अटक, आणखी काहीजणांच्या अटकेची शक्यता
प्रतिनिधी/ म्हापसा
सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित सुधीर सांगवान तसेच सुखविंदर सिंग या दोघांना म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात रिमांडसाठी हजर केले असता या दोघांनाही 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, शुक्रवारी हणजूण पोलिसांनी कर्लीज बार ऍण्ड रेस्टॉरंटचे मालक एडवीन नुनीस व ड्रग्ज पेडलर दत्तप्रसाद गावकर (वाळपई) यांना ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली. यात आतापर्यंत 4 जणांना पोलिसांनी अटक केली असून आणखी काही जणांना यात अटक होण्याची शक्यता आहे. सोनाली खून प्रकरण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले आहे. दरम्यान, पोलिसांनी कर्लीज रेस्टॉरंटची तपासणी सुरू केली असता शौचालयात मेठापेथामाईन (2.20 ग्रॅम) हा अत्यंत घातक प्रकारचा अमलीपदार्थ आढळून आला असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.
ड्रग्ज आढळल्याने त्याच्या आधारावर नुनीस याला अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीवर नंतर ड्रग्ज पेडलर दत्तप्रसाद गावकर यालाही अटक केली आहे. या दोघांविरोधात एनडीपीएस कायदा कलम 22 (ब), 29, 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. प्रमुख दोन्ही संशयित तपासकार्यात सहकार्य करीत आहेत. मात्र फोगटला मारण्याचा उद्देश अद्यापही त्यांनी स्पष्ट केला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. फोगट यांच्या निधनानंतर सांगवान तसेच त्याचा दुसरा साथीदार सुखविंदर सिंग यांची पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीवेळी त्यांनी पेयातून ड्रग्जचा ओव्हरडोस दिल्याचे कबूल केले होते. सोनाली यांचा दोघांकडून बेदम मारहाणही करण्यात आली होती. हे ड्रग्ज देताना सीसीटीव्ही पॅमेरामध्ये कैद झाले आहेत. त्या आधारे हणजूण पोलीस तपास करीत आहेत.
सोनाली यांना नृत्य करताना अनेकांनी पाहिले होते
कर्लीज क्लबमध्ये सोनाली यांची तब्येत बिघडली तेव्हा तिथे उपस्थित असणाऱया प्रत्यक्षदर्शीने कर्लीज क्लबमध्ये काय घडलेले ते सांगितले आहे. सोनाली त्या रात्री पार्टीमध्ये साथीदारासह नाचत होत्या. त्याचवेळी त्यांची तब्येत बिघडू लागली तेव्हा गोंधळ उडाला. सारे तिकडे धावले. आपण त्यांना पाहताच ओळखले की त्या टीकटॉक स्टार सोनाली आहेत. यानंतर लगेचच काही लोक सोनाली यांना टॉयलेटच्या दिशेने घेऊन जात असल्याचे आपण पाहिले. यानंतर सारे आपापल्या कामात व्यस्त झाले, अशी माहिती उपस्थित नागरिकाने दिली.
कर्लीज रेस्टॉरंटमधील शौचालयात मेटापेथामाईन हे ड्रग्स सापडल्यानंतर याच ड्रग्सचा वापर सोनाली यांच्यावर करण्यात आला होता, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर विषही देण्यात आले होते का? याची पडताळणी पोलीस करीत आहेत. दत्तप्रसाद गावकर हा ग्रॅण्ड लिओनी रिसॉर्टमध्ये रुमबॉय म्हणून काम पाहत होता. रुममध्ये त्याची ओळख झाली होती.
पोलिसांकडून अनेकांचे जबाब नेंद
सोनाली यांच्या मृत्यूशी संबंधित अनेकांचे जबाब हणजूण पोलिसांकडून घेण्यात आले. यामध्ये त्यांना कर्लीज बारमधील कर्मचारी, इस्पितळापर्यंत आणणारा टॅक्सी चालक, इस्पितळातील कर्मचारी तसेच इतर अनेक संबंधितांची चौकशी करण्याचे काम पोलिसांकडून हाती घेण्यात आले आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांचा ज्या हॉटेलात मुक्काम होता तसेच ज्या हॉटेलात पार्टी करण्यात आली तेथील सीसीटीव्ही फुटेज जप्त केल्यानंतर त्याची पडताळणी सुरू केली आहे. त्या आधारावर पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
‘कर्लीज’च्या पहिल्या मजल्याला लावले टाळे
कर्लीज रेस्टॉरंटच्या पहिल्या मजल्यावर हा प्रकार घडला आहे. त्यामुळे सध्या पहिल्या मजल्याला टाळे ठोकण्यात आले असून रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या मजल्यावरील पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता असल्याने त्याला फक्त टाळे लावण्यात आले ते सील केले नसल्याचे सांगितले. दरम्यान, आयपीएस पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशल देसाई अधिक तपास करीत आहेत.
सोनाली व पीए एकाच फ्लॅटमध्ये राहत होते
सोनाली फोगट यांनी ग्रुग्राममध्ये एक फ्लॅट भाडय़ाने घेतला होता. तो फ्लॅट त्यांनी सुधीरसोबत मिळून घेतला होता. सेक्टर 102मध्ये हा फ्लॅट होता. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृतानुसार सुधीरने हा फ्लॅट भाडय़ाने घेताना सोनाली ही त्याची पत्नी असल्याचे सांगितले होते. तसेच तिथे राहत असलेल्या लोकांनाही तो हेच सांगत होता. एवढेच नव्हे तर घर भाडय़ाने घेताना एक पोलीस व्हेरिफिकेशनही झाले होते. या फ्लॅटवर सोनाली गोव्याला निघण्यापूर्वी राहण्यासाठी गेल्या होत्या. अशी माहिती समोर येत आहे. सुधीर आणि सोनाली या फ्लॅटवर आले काही वेळ राहिले आणि त्यांची कार सोसायटीतच पार्क करून ते टॅक्सीने विमानतळाकडे निघाले. यावर पोलीस अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.