पदार्थविज्ञानच्या 4 प्राध्यापकांसह 25 माजी विद्यार्थी
कोल्हापूर : जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलीय. यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या दहा संशोधकांना मानांकन प्राप्त झाले आहे. यामध्ये पदार्थविज्ञान अधिविभागातील 4 प्राध्यापकांसह 25 माजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी बहुतेकजण परदेशात पोस्ट डॉक्टरेट करत आहेत. ही विद्यापीठाच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाने गत वर्षी जाहीर केलेल्या जागतिक स्तरावरील दोन टक्के आघाडीच्या संशोधकांच्या यादीमध्येही शिवाजी विद्यापीठातील प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, पदार्थविज्ञानचे डॉ. केशव राजपुरे, डॉ. ए. व्ही. राव, डॉ. एस. पी. गोविंदवार, डॉ. ए. व्ही. मोहोळकर, जैवरसायनशास्त्र डॉ. ज्योती जाधव, रसायनशास्त्र प्रा. हेमराज यादव, प्रा. के. एम. गरडकर, नॅनोतंत्रज्ञान डॉ. सचिन ओतारी, इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स प्रा. तुकाराम डोंगळे यांचा समावेश आहे. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून या संशोधकांचा विद्यापीठाता गौरव केला.
‘स्कोपस’ डेटाबेसवर आधारित ‘एल्सव्हिअर’ने तयार केलेल्या यादीसाठी सन 1960 ते 2022 या कालावधीमध्ये संशोधकीय योगदान देणाऱ्या संशोधकांचा सार्वकालिक कामगिरी आणि वार्षिक कामगिरी अशा दोन निकषांवर विचार केला आहे. 22 विज्ञान विषय आणि 176 उपविषयांमधील संशोधनाची दखल घेतली आहे. शोधनिबंधांची संख्या आणि दर्जा, संशोधन पत्रिकेचा दर्जा, शोधनिबंधाला प्राप्त झालेली सायटेशन्स, एकच लेखक असणारे शोधनिबंध, स्वतःची सायटेशन्स वगळून असणारे शोधनिबंध अशा अनेक निकषांवर ही यादी जाहीर केलीय. सार्वकालिक यादीत प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, निवृत्त शिक्षक डॉ. ए. व्यंकटेश्वरा राव, डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. आर. एस. माने, डॉ. बी. आर. संकपाळ, डॉ. दिपक डुबल, डॉ. संभाजी शिंदे यांचा समावेश आहे. तर वार्षिक डेटाबेसमध्ये डॉ. ए. व्ही. मोहोळकर, डॉ. आर. एस. देवण, डॉ. व्ही. एल. मथे, डॉ. एच. एम. पठाण, डॉ. एस. एम. पवार, डॉ. आर. आर. साळुंखे, डॉ. वाय. एम. हुंगे, डॉ. एस. एस. माळी, डॉ. आर. सी. कांबळे, डॉ. एस. एस. लठ्ठे, डॉ. एन. आर. चोडणकर, डॉ. एस. जे. पाटील, डॉ. एस .के. शिंदे, डॉ. अकबर इनामदार, डॉ. गिरीश गुंड, डॉ. आर. सी. पवार, डॉ. उमाकांत पाटील, डॉ. ए. डी. जगदाळे, डॉ. एम. पी. सूर्यवंशी यांचा समावेश आहे. संशोधकांच्या सत्कारावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. सरिता ठकार, डॉ. एम. एस. देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. धनंजय सुतार आदी उपस्थित होते.
संशोधनातील कामगिरी विद्यापीठास भूषणावहः कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के
विद्यापीठातील दहा शिक्षक जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांच्या यादीत स्थान प्राप्त केले. यामागे त्यांचे सातत्यपूर्ण संशोधकीय परिश्रम आहेत. त्यामुळेच सलगपणाने या यादीमधील विद्यापीठाचे स्थान अबाधित राखू शकले. ही बाब विद्यापीठास भूषणावह असून नवसंशोधकांना प्रेरणा देणारी आहे.