शैक्षणिक जिल्हय़ात 33 हजार 807 परीक्षार्थी
प्रतिनिधी /बेळगाव
दहावी परीक्षेचा निकाल गुरुवार दि. 19 रोजी दुपारी जाहीर करण्यात येणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 33 हजार 807 परीक्षार्थींनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. दहावीच्या निकालावर पुढील शिक्षण अवलंबून असल्याने निकाल काय लागतो, याकडे विद्यार्थ्यांसोबत पालकांचेही लक्ष लागले आहे.
कर्नाटकात दि. 28 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा पार पडली. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 139 केंद्रांवर परीक्षा पार पडल्या. परीक्षा झाल्यानंतर मूल्यमापनाची प्रक्रिया पार पडली. यावर्षी मूल्यमापनावेळी अनेक विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी दांडी मारल्याने मूल्यमापनाला विलंब झाला. 11 मे रोजी निकाल जाहीर होणार होता. परंतु मूल्यमापन पूर्ण न झाल्याने आता 19 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
वेबसाईटवर निकाल पाहता येणार…
गुरुवार दि. 19 रोजी शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. निकाल जसजसा जवळ येत आहे, तसतशी विद्यार्थ्यांची धाकधूक वाढत आहे. पुढील अभ्यासक्रमासाठी निकोप स्पर्धा करावी लागणार असल्याने गुण किती मिळतात, यावर पुढील शिक्षण ठरणार आहे. शिक्षण विभागाच्या www.karresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.