29 ते 31 जानेवारीदरम्यान चौकशीला हजर राहण्याची सूचना
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दहावे समन्स पाठवले आहे. या समन्समध्ये त्यांना कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी 29 किंवा 31 जानेवारीदरम्यान पुन्हा हजर राहण्याची सूचना केली आहे. या तीन दिवसांमध्ये ईडी कार्यालयात हजर न झाल्यास ईडीचे अधिकारी आपल्या घरी पोहोचतील, असा इशाराही देण्यात आला आहे. याआधी आठव्या समन्सनंतर तपास यंत्रणेने 20 जानेवारीला मुख्यमंत्र्यांची चौकशी केली होती. या चौकशीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आपण कोणतीही चोरी केली नसून चौकशीसाठी सदैव सज्ज असल्याचे प्रतिपादन केले होते.
कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात हेमंत सोरेन यांना यापूर्वी गुऊवारी समन्स पाठवण्यात आले होते. या समन्समध्ये चौकशीची तारीख आणि वेळ नमूद करण्यात आली नव्हती. त्यापूर्वी 22 जानेवारीला मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या समन्समध्ये त्यांना 27 ते 31 जानेवारी दरम्यान चौकशीसाठी वेळ निश्चित करून 25 जानेवारीपर्यंत एजन्सीला कळवण्यास सांगितले होते. अशा परिस्थितीत तपास यंत्रणेने पुन्हा एकदा समन्स पाठवत चौकशीसाठी वेळ आणि ठिकाण निश्चित करण्यास सांगितले आहे.