खलिस्तानवादी नेता पंजाबमध्येच असल्याचा संशय ः ताब्यात घेण्यासाठी हालचाली गतिमान
वृत्तसंस्था/ चंदिगढ
‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग पंजाबमध्येच लपून बसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच काही धार्मिक नेते त्याच्या आत्मसमर्पणासाठी मध्यस्थी करत असल्याची चर्चा असून सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतपालने आत्मसमर्पण करण्यासाठी तीन अटी ठेवल्या आहेत. त्यानुसार पोलीस कोठडीत आपल्यावर हल्ला करू नये, आपल्याला फक्त पंजाबच्या तुरुंगातच ठेवले पाहिजे आणि आपल्या आत्मसमर्पणाला अटक असे संबोधू नये अशा अटी त्याने ठेवल्याचे समजते.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात असलेल्या श्री अकाल तख्त साहिब किंवा भटिंडा येथील तलवंडी साहिब येथील तख्त श्री दमदमा साहिब येथे येऊन तो आत्मसमर्पण करू शकतो. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला. दोन्ही शहरात नाकाबंदी करून वाहनांची झडती घेतली जात आहे. यापूर्वी मंगळवारी रात्री पोलिसांनी एका संशयित इनोव्हाचा पाठलाग करून त्याचा शोध घेतल्याचेही समजते. संशयित इनोव्हा फगवाडाहून होशियारपूरला जात होती. त्यात अमृतपाल आणि पापलप्रीत हे दोघे स्वार असल्याचे समजल्यानंतर पंजाब पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स टीमने त्याचा 37 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. पोलिसांच्या कारवाईनंतर तरुणांनी इनोव्हा गुरुद्वाराजवळ सोडून पळ काढला. सदर वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर जालंधर, होशियारपूर आणि कपूरथला येथील 700 पोलीस कर्मचाऱयांनी रात्रभर होशियारपूर आणि फगवाडामध्ये शोधमोहीम राबवली. मात्र, तपासात इनोव्हाचा क्रमांक बनावट निघाला.
अमृतपाल गेल्या दोन आठवडय़ांपूर्वीपासून तपास यंत्रणांना गुंगारा देत आहे. त्याच्या काही समर्थक आणि निकटवर्तियांना अटक झाली असली तरी अमृतपाल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो राज्याबाहेर किंवा देशाबाहेर पसार झाल्याच्या वावडय़ा उठल्यानंतर तपास यंत्रणांनी आपली शोधमोहीम व्यापक केली असली तरी तो गेल्या दहा-बारा दिवसांपासून पोलिसांपासून बचाव करत आहे.
पंजाब पोलिसात मोठे फेरबदल
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या शरणागतीच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांमध्ये मोठय़ा प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. अमृतपाल सिंगला अटक करण्यात पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे एका आयपीएस अधिकाऱयासह नऊ पोलीस अधिकाऱयांची बदली करण्यात आल्याचे मानले जात आहे. यातील बहुतांश अधिकारी जालंधरमधील आहेत.
देवाने साथ दिली…. अमृतपालचा व्हिडीओ प्रसारित
अमृतपाल सिंग याने बुधवारी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. मी मजेत असून कुणीही माझ्या केसाला धक्का लावू शकत नाही, असे तो सदर व्हिडीओमध्ये म्हणत आहे. तसेच आपल्याला देवाचा आशीर्वाद असल्याने पोलिसांच्या गराडय़ातून सुरक्षितपणे निसटल्याचा दावाही त्याने केला. माझ्या अटकेचे धागेदोरे देवाच्या हातात आहेत. त्याची इच्छा झाल्याशिवाय मला अटक होणार नाही. सर्व शक्तिमान देवाने मला खूप साथ दिली आहे, असेही अमृतपाल या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतो.