शाहूवाडी प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील शिवारे येथे बिबट्याने मंगळवारी पहाटे केलेल्या हल्ल्यामध्ये चार शेळ्या आणि एक बोकड यांचा फडशा पडला आहे. शिवारे गावच्या पश्चिम दिशेला वारणेच्या उजव्या कालव्यानजीक आनंद नामदेव पाटील यांच्या गोठ्यामधील शेळ्य़ांवर बिबटयाने केलेल्या हल्यामूळे सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आनंदा पाटील यांचा मुलगा सकाळी जनावरांच्या गोठ्याकडे गेल्यानंतर सदरची घटना त्यांच्या निदर्शनास आली.
गेल्या पंधरा दिवसापासून वारणा कापशी, सरूड, शिवारे, माणगाव तसेच भेडसगाव या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला आहे. मादी बिबट्यासह दोन बछडे देखील परिसरातील लोकांना दिसून आले आहेत. सरूड येथे लोकवस्तीत देखील बिबट्या निदर्शनास आला होता. दरम्यान पोलीस पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिली. यावेळी वनक्षेत्रपाल अमित भोसले, वनपाल मेहबूब नायकवडी, वनरक्षक आशिष पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरामध्ये बिबट्याच्या पाऊलखुणा व शेळ्यांना फरपटत नेल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत. सदर घटनेचा पंचनामा केला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाईची रक्कम लवकरात लवकर देण्याचे आश्वासन देण्यात आले.
शिवारेसह परिसरातील अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर असल्याने तीन ते चार गावांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. वन विभागाने सदरच्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी सर्वसामान्य नागरिकांच्यातून व्यक्त केली जात आहे.