Tarun Bharat

दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणे आवश्यक

एनएसए डोवालांचे प्रतिपादन ः मध्य-आशियाई देशांसोबत सुरक्षाविषयक बैठक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

वित्तपुरवठा हेच दहशतवादाला पोसणारे मूळ आहे. दहशतवादाचा वित्तपुरवठा रोखण्याला अधिक प्राथमिकता दिली जावी असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी केले आहे. प्रमुख क्षेत्रीय सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकसमान व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने डोवाल यांनी मध्यआशियाई क्षेत्रातील देशांसोबतच्या बैठकीला संबोधित केले आहे.

डोवाल यांनी स्वतःच्या संबोधनात चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटव्हि’ प्रकल्पाचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला आहे. संपर्क प्रकल्पांचा विस्तार करताना सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला जाईल हे पाहणे गरजेचे आहे. मध्य आशिया हा भारताचा ‘विस्तारित शेजारी’ असल्याचे म्हणत डोवाल यांनी भारत या क्षेत्राला ‘सर्वोच्च प्राथमिकता’ देत असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तान एक महत्त्वपूर्ण मुद्दा असून त्यासंबंधी सर्वांनाच चिंता आहे. अफगाणिस्तानसह क्षेत्रातील दहशतवादाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकसमान व्यवस्था निर्माण करण्याची गरज असल्याचे डोवाल म्हणाले.

मध्य आशियाई देशांसोबत संपर्कव्यवस्था निर्माण करण्याला भारताची प्राथमिकता आहे. भारत या क्षेत्रात सहकार्य, गुंतवणूक आणि संपर्क प्रस्थापित करण्यास तयार आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांमधील उलथापालथ आणि भविष्याबद्दलच्या अनिश्चिततेदरम्यान ही बैठक होत आहे. एक शांततापूर्ण, सुरक्षित आणि समृद्ध मध्य आशियासाठी आमचे हित एकसारखेच आहेत. वित्तपुरवठा हाच दहशतवादाचा आधार आहे. दहशतवादाचा वित्तपुरवठा रोखण्यावर आम्हा सर्वांनी प्राथमिकता द्यावी असे डोवाल यांनी म्हटले आहे. कजाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी या बैठकीत भाग घेतला आहे. तर तुर्कमेनिस्तानचे प्रतिनिधित्व भारतातील त्याचे राजदूत करत आहेत.

अफगाणिस्तान समवेत क्षेत्रात दहशतवाद्यांचे नेटवर्क कायम राहणे मोठय़ा चिंतेचा विषय आहे. वित्तपुरवठा हेच दहशतवादाला जिवंत ठेवत आहे. दहशतवादाचा वित्तपुरवठा रोखण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्यांनी दहशतवादी कृत्यांमध्ये सामील संस्थांना सहाय्य प्रदान करणे टाळावे असे डोवाल यांनी नमूद पेले आहे. मध्य आशियाई देशांसोबतची ही सुरक्षाविषयक बैठक अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मध्य आशियातील अनेक देश हे अफगाणिस्तानचे शेजारी देश आहेत.

Related Stories

भारत-चीन सीमेवर अतिरिक्त सैनिक तुकडय़ा

Patil_p

आंदोलक शेतकऱयांनी पाळला ‘काळा दिवस’

Patil_p

राम मंदिरासाठी 2,100 कोटींचे निधी संकलन

Patil_p

ऑनलाईन शिक्षणासमवेत संस्कारांचेही हस्तांतरण

Patil_p

उपचारातील रुग्णसंख्येत झपाटय़ाने घट

Omkar B

राम मंदिराच्या पाया खोदाईचे काम सुरू

Patil_p