इंडोनेशिया अन् भारतीय च्या उलेमांना केले संबोधित ः दहशतवादाच्या मुद्दय़ावर मांडली भूमिका
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इस्लाम हा शांततेचा धर्म असल्याने यात उग्रवाद किंवा दहशतवादाला कुठलेच स्थान नसल्याचे म्हणत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लोकशाहीत धर्माच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली आहे. लोकशाहीत द्वेषयुक्त वक्तव्ये आणि धर्माच्या गैरवापरालाही कुठलेच स्थान नसल्याचे डोवाल यांनी भारत आणि इंडेनेशियात परस्पर शांतता आणि सामाजिक सौहार्दाच्या संस्कृतीला बळ देण्याप्रकरणी उलेमांच्या भूमिकेवर बोलताना म्हटले आहे. सीमापार दहशतवाद अन् इस्लामिक स्टेटकडून प्रेरित दहशतवाद हा मानवतेसमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे डोवाल यांनी नमूद पेले आहे.
नवी दिल्लीतील इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये आयोजित परिषदेत डोवाल यांनी स्वतःचे विचार मांडले आहेत. अतिवाद अन् दहशतवाद हे इस्लामच्या विरोधात आहेत, कारण इस्लामचा अर्थ शांती आहे. एका माणसाची हत्या ही पूर्ण मानवतेच्या हत्येसमान असल्याचे इस्लाम म्हणत असल्याचे डोवाल यांनी नमूद केले आहे.
सहिष्णुता, सौहार्द अन् शांततापूर्ण सह-अस्तित्वाला चालना देण्यात सहकार्य करणाऱया भारतीय आणि इंडोनेशियन उलेमांना एकत्र आणणे हा या चर्चेचा उद्देश आहे. धर्माचा गैरवापर करण्याची अनुमती इस्लाम देत नाही. दहशतवाद, अतिवाद, कट्टरवाद हा कुठल्याही आधारावर न्यायसंगत नाही. दहशतवाद ही विकृती असून त्याच्या विरोधात आम्हा सर्वांनी आवाज उठविणे आवश्यक असल्याचे डोवाल यांनी म्हटले आहे.
धर्माचा संकुचित वापर नको
दहशतवाद अन् कट्टरतावाद पसरविणाऱया शक्तींना केला जाणार विरोध हा कुठल्याही धर्माच्या विरोधातील संघर्ष मानला जाऊ नये. तरुणाईला योग्य दिशा देण्याची गरज आहे. धर्माचा संकुचित वापर होऊ नये. उलेमांनी तंत्रज्ञानाचा वापर दुष्प्रचार अन् द्वेष दूर करण्यासाठी करावा. लोकशाहीत द्वेषयुक्त विधाने, भेदभाव, दुष्प्रचार, हिंसा अन् धर्माच्या दुरुपयोगाला कुठलेच स्थान नसल्याचे डोवाल यांनी म्हटले आहे.
धर्म शांततेचा प्रतीक
या परिषदेची कल्पना ही अजित डोवाल यांची होती. इंडोनेशियातील उलेमांना घेऊन येथे आलो आहे. इस्लामच्या नियमांचे पालन करत इंडोनेशियाचे सार्वभौमत्व कायम राखणे हा आमचा संकल्प आहे. धर्म हा शांततेचा प्रतीक असतो. आम्ही सर्वजण सध्या अनेक आव्हानांना तोंड देत आहोत, गरीबी, पर्यावरण आणि अन्नटंचाई अशा अनेक समस्या आमच्यासमोर असल्याचे उद्गार इंडोनेशियाचे मंत्री मोहम्मद मफहूद यांनी म्हटले आहे.
सीरिया-अफगाणिस्तान दहशतवादाचे व्यासपीठ
सीरिया आणि अफगाणिस्तानला दहशतवादाचे व्यासपीठ करण्यात आले आहे. आशियात सौहार्द अन् शांतता प्रस्थापित करणे हे आमचे लक्ष्य आहे. भारत आणि इंडोनेशियाचे संबंध कित्येक शतके जुने आहेत. चोल वंशाच्या काळातही भारताचे इंडोनेशियासोबत व्यापारी संबंध होते असे इंडोनेशियाच्या मंत्र्यांनी म्हटले आहे.
भारतीय संघटनाही सामील
इंडोनेशियाचे राजकीय, कायदा अन् सुरक्षा विषयक मंत्री मोहम्मद महफूद हे सध्या भारताच्या दौऱयावर आहेत. त्यांच्यासोबत 24 सदस्यीय शिष्टमंडळ भारतात आले आहे. यात उलेमा आणि धार्मिक नेते देखील सामील आहेत. या शिष्टमंडळाने भारतातील धर्मगुरुंशी कट्टरतावादाच्या मुद्दय़ावर चर्चा केली आहे. यात जमीयत ए उलेमा-ए-हिंद, लखनौतील आसिफी मस्जिद, बोहरा समुदायाचे प्रतिनिधी सामील झाले. इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने विदेशमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली आहे. तसेच ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत.