वृत्तसंस्था/ किसमायो
सोमालियातील किसमायो शहरात रविवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी किसमायो हॉटेलवर हल्ला केला. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला तर 47 जण जखमी झाले आहेत. हॉटेलमध्ये प्रथम एक स्फोट घडवून आणल्यावर गोळीबार सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हॉटेलमधील सुरक्षारक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली असून यात सर्व दहशतवादी मारले गेले ओत. अल-शबाब या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
संबंधित हॉटेल एका शाळेनजीक होते. या हल्ल्यात काही विद्यार्थीही मारले गेले आहेत. स्फोटकांनी भरलेली एक कार हॉटेलच्या प्रवेशद्वाराला धडकविण्यात आल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर तीन दहशतवाद्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.
2019 मध्ये देखील किसमायो हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता आणि यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. तर 56 जण जखमी झाले होते. ऑगस्ट 2022 मध्ये सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील हयात हॉटेलमध्ये घुसून दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या घटनेत 20 जण मारले गेले हेते.