बारामुल्ला-सोपोरमध्ये ‘तोयबा’च्या दोघांना अटक
@ श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीर पोलिसांनी बारामुल्लाच्या सोपोरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ओव्हरग्राउंड वर्कर मॉडय़ूलचा पर्दाफाश केला. पोलिसांनी येथून दोघांना अटकही केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोसियागड चौक चिंकापोरा येथे लष्कर आणि सीआरपीएफने एकत्रितपणे एक चौकी लावली होती. यादरम्यानच्या तपासावेळी डेंजरपोऱयाकडून चिंकीपोराच्या दिशेने दोन लोकांच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले. दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा दलांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन ग्रेनेड जप्त केले आहेत. बांदीपोरा येथील शाकीर अकबर गोर्जी आणि बारामुल्ला येथील मोहसीन वानी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचे ग्राउंड वर्कर असून ते यापूर्वी सुरक्षा दल आणि नागरिकांवर झालेल्या हल्ल्यात आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले.