प्रतिनिधी /पणजी
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रु. 277 कोटी खर्चुन टर्शरी कॅन्सर सेंटर सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी विधानसभेत दिली. नगरनियोजन कायद्याच्या 16 बी कलमांतर्गत एकाही प्रकरणाचा विचार होणार नाही. तो विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे निकाल लागेपर्यंत ती प्रकरणे जैसे थे ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोव्याच्या भल्यासाठीच ओडीपीसंदर्भात निर्णय घेण्यात आले असून बेकायदा रुपांतरीत केलेल्या ज्या जमिनी पूर्ववत केल्या आहेत त्यात कोणताही बदल होणार नाही, असे राणे यांनी बजावले. आरोग्य, नगरनियोजन बाल-महिला विकास, वन अशा विविध खात्यांवरील मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना राणे बोलत होते.
ओडीपी पाच वर्षांसाठी तयार करण्याचा मानस आहे. तथापि कायद्यात दुरुस्ती करून मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेऊन मगच तो कालावधी ठरवावा लागेल, असा खुलासा त्यांनी केला. आरोग्य खाते क्षेत्रातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दोन्ही जिल्हा हॉस्पिटल्स आणि फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात सर्व आरोग्य सेवा देण्यावर सरकारचा भर असून त्याला थोडा वेळ लागेल. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात कॅथलॅब सुरू करणार असल्याचे राणे म्हणाले.
खासगी वनांचे सर्वेक्षण चालू असून ते लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. पालिकेतील सात वर्षे काम केलेल्यांना नोकरीत कायम करण्याचा विचार चालू आहे. नगरनियोजन कायद्यातल 16-बी कलम माहीत नाही ते वाचलेही नाही आणि त्याची प्रकरणे पुढे कार्यवाहीसाठी विचारात घेतली जाणार नाहीत. त्या 16-बी अंतर्गत मागील सरकारच्या काळात 6211 जमीन रुपांतर प्रकरणे आल्याचे त्यांनी सांगितले.
जैव संवेदनशील क्षेत्रात गोव्यातील 99 गावे समाविष्ट करण्यात आली असून अभयारण्यातील गावांचे तेथील लोकांचे हितरक्षण करणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यांचे पुनर्वसन करणे शक्य नाही आणि तेवढी जागा आता उपलब्ध नसल्याचे राणे यांनी नमूद केले. गोमेकॉतील डॉक्टर चांगले काम करतात असे सांगून तेथील रुग्णांचा बोजा-दबाव कमी करण्यासाठी दोन्ही जिल्हा इस्पितळात तसेच आरोग्य केंद्रांतील सोयी सुविधा वाढवण्याचा सरकारचा इरादा असल्याचे राणे म्हणाले. कांदोळी-साळगाव येथे कम्युनिटी आरोग्य केंद्र सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब, सिटी स्कॅन व ब्युरो सर्जरी विभाग सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दिनदयाळ आरोग्य विमा योजनेची व्याप्ती रु. 5 लाखापर्यंत वाढवा, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली. त्यात सर्व प्रकारचे आजार-उपचार समाविष्ट करावेत. ऑनलाइंन ऍपमधून होणारी औषधांची विक्री बंद करा. सुपर स्पशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करा. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची हिशेब तपासणी (ऑडीट) अर्थात चौकशी करण्याची गरज सरदेसाई यांनी वर्तवली. दक्षिण गोव्यात महिला आयोगाचे कार्यालय सुरू करावे. तेथील महिलांना पणजीत जावे लागते. खासगी वने अद्याप अधोरेखित केलेली नाहीत. काहीजण राणे पेटवतात. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वनमहामंडळास अधिकार देण्याची मागणी सरदेसाई यांनी केली.
गोमेकॉतून मृतदेह बाहेर नेण्यासाठी रु. 10,000 घेतले जातात आणि तेथे धंदा चालू असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. मानसोपचार रुग्णालय, डेंटल हॉस्पीटलची शाखा दक्षिण गोव्यात सुरू करण्याची गरज आहे. नगरनियोजन कायद्यातील 16-बी हे कलम रद्द करावे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली. दक्षिण आणि त्यात एका राजकारण्याचा हात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. झुवारी ऍग्रोच्या जमीन विक्रीत रु. 50,000 कोटींचा घोटाळा आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला.