गडकरी : चीनकडून आयात न करण्याची सूचना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकन कंपनी टेस्ला (tesla) आपल्या इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन भारतात करण्याची मागील काही दिवसांपासून योजना आखत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सध्या कोणतीही समस्या नसल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakari) यांनी स्पष्ट केले आहे. असे जरी असले तरी काही बाबतीत टेस्लाला अटी मान्य कराव्या लागणार आहेत, असेही गडकरी यांनी सुचवले आहे. टेस्ला कंपनीने चीनकडून कोणत्याही प्रकारची आयात करु नये असे आवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
जगात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत अव्वल असणाऱया टेस्लाला भारतात कार्सचे उत्पादन घ्यायचे आहे. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांना भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करायची आहे त्याचे स्वागतच आहे. कारण भारत ही सर्वात मोठी वाहनांसाठीची बाजारपेठ आहे. त्यांना भारतामधूनही अन्य देशात आपली उत्पादने निर्यात करता येतील मात्र त्यांना चीनसोबतचे धोरण मात्र काहीसे बदलावे लागणार आहे. त्यांनी उत्पादन चीनमध्ये बनवून वाहनांना भारतात विकणे हा प्रस्ताव भारतासाठी योग्य नसल्याचे स्पष्टीकरण मंत्री गडकरी यांनी या प्रसंगी दिले आहे.