वृत्तसंस्था/ पुणे
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे चेन्नई सुपर किंग्ज आणि पहिल्यांदा सहभागी झालेल्या गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल. या दोन्ही संघांना लाभलेले नवे कर्णधार रविंद्र जडेजा आणि हार्दिक पंडय़ा यांच्या कप्तानपदाची कसोटी राहील.
रविंद्र जडेजा आणि हार्दिक पंडय़ा हे आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे गेली काही वर्षे भारतीय संघातून आपली ओळख दिली आहे. रविवारी येथे होणाऱया सामन्यात या दोन्ही कर्णधारांच्या कप्तानपदाची सत्वपरीक्षा राहील. या दोन्ही संघांनी या स्पर्धेतील आपले यापूर्वीचे शेवटचे सामने जिंकले आहेत. विद्यमान विजेत्या चेन्नई संघाचे नेतृत्व यापूर्वी धोनीकडे होते पण त्याने यावेळी कप्तानपदाची जबाबदारी घेतली नाही. त्याच्या जागी अष्टपैलू रविंद्र जडेजाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. गेल्या काही दिवसापासून तंदुरूस्तीसाठी झगडणारा हार्दिक पांडय़ा यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होते पण मुंबई इंडियन्स संघाने यावेळी हार्दिक पंडय़ाला निवडले नाही. आता या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सचे नेतृत्व हार्दिक पांडय़ाकडे सोपविण्यात आले.
गुजरात टायटन्सने आतापर्यंत या स्पर्धेत पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. त्यांना सनरायजर्स हैदराबाद कडून हार पत्करावी लागली होती. या पराभवानंतर गुजरातने गुरूवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळविला. जडेजाच्या चेन्नई संघाने या स्पर्धेत पहिले चार सामने गमविल्यानंतर त्यांनी बेंगळूर संघावर 23 धावांनी विजय मिळवित आपल्या विजयाचे खाते उघडले. बेंगळूरविरूद्धच्या सामन्यात चेन्नई संघातील फिरकी गोलंदाज कर्णधार जडेजा आणि महेश तिक्ष्णा यांनी एकूण सात गडी बाद केले. अष्टपैलू दीपक चहर पाठ दुखापतीमुळे उपलब्ध होवू शकल्याने त्याची उणीव चेन्नईला भासत आहे. जॉर्डन आणि ड्वेन ब्रॅव्हो यांनी गेल्या सामन्यात बऱयापैकी कामगिरी केली आहे. गुजरात संघाची गोलंदाजीची बाजू भक्कम असून फर्ग्युसन, मोहम्मद शमी तसेच हार्दिक पांडय़ा आणि रशीद खान हे प्रमुख गोलंदाज आहेत. हार्दिक पंडय़ा, अभिनव मनोहर, दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया यांच्यावर गुजरात संघाच्या फलंदाजीची भिस्त राहील. चेन्नई संघातील ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली, रायडू फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहेत. शिवम दुबेने गेल्या सामन्यात नाबाद 95 तसेच रॉबिन उथाप्पाने 85 धावा जमवित आपल्या संघाला बेंगळूर संघावर विजय मिळवून देण्यास महत्त्वाचे योगदान दिले होते.
चेन्नई सुपर किंग्ज- रविंद्र जडेजा (कर्णधार), धोनी, मोईन अली, गायकवाड, ड्वेन ब्रॅव्हो, रायडू, उथाप्पा, सँटेनर, जॉर्डन, मिलेनी, कॉन्वे, शिवम दुबे, प्रेटोरियस, तिक्ष्णा, हंगीरगेकर, तुषार देशपांडे, असिफ, निशांत,जगदीशन, सेनापती, भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंग आणि चौधरी.
गुजरात टायटन्स- हार्दिक पंडय़ा (कर्णधार), अभिनव मनोहर, मिलर, गुरकिरात सिंग, साई सुदर्शन, शुभम गिल, तेवातिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, गुरबाज, साहा, जोसेफ, दर्शन नालकांडे, ड्रेक्स, जयंत यादव, फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, सांगवान, रशीद खान, साई किशोर, वरूण ऍरॉन आणि दयाल.
सामन्याची वेळ ः सायंकाळी 7.30 पासून