Tarun Bharat

भारत अ संघाचा कसोटी मालिकाविजय

सौरभ कुमारचे 6 बळी ः बांगलादेश अ संघाचा 1 डाव आणि 123 धावांनी पराभव

वृत्तसंस्था/ सिलेत

डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमारच्या शानदार कामगिरीच्या जोरावर शुक्रवारी येथे भारत अ संघाने दुसऱया सामन्यात यजमान बांगलादेश अ संघाचा 1 डाव आणि 123 धावांनी दणदणीत पराभव करून दोन सामन्यांची ही कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. या दुसऱया सामन्यात सौरभ कुमारने 74 धावात 6 गडी बाद केले.

बांगलादेश आणि भारत यांच्यात 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱया दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आता दुखापतीने जायबंदी झालेला अष्टपैलू रविंद्र जडेजाच्या जागी सौरभ कुमारला कदाचित संधी देण्याचा विचार निवड समिती करेल.

या दुसऱया सामन्यात बांगलादेश अ संघाचा डाव 252 धावात आटोपल्यानंतर भारत अ संघाने आपला पहिला डाव 9 बाद 562 धावांवर घोषित करून बांगलादेश अ संघावर 310 धावांची भक्कम आघाडी मिळविली. त्यानंतर सौरभ कुमारच्या जादुमय फिरकीसमोर बांगलादेश अ संघाचा डाव 79.5 षटकात 187 धावात आटोपला. या सामन्यात भारत अ संघाच्या पहिल्या डावात कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने दीडशतक झळकवताना 248 चेंडूत 2 षटकार आणि 14 चौकारांसह 157, चेतेश्वर पुजाराने 7 चौकारांसह 52, एस. भरतने 10 चौकारांसह 77, जयंत यादवने 10 चौकारांसह 83 आणि सौरभ कुमारने 2 षटकार आणि 7 चौकारांसह 55 तसेच नवदीप सैनीने 68 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 50 धावा जमविल्या. बांगलादेश अ संघातर्फे हसन मुराद आणि मुशफिक हसन यांनी प्रत्येकी 3 तर एस. खानने 2 आणि मोमिनुल हकने 1 गडी बाद केला.

310 धावांनी पिछाडीवर असलेल्या बांगलादेश अ संघाने आपल्या दुसऱया डावाला सुरुवात केली. पण भारत अ संघाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. सलामीचा शदमान इस्लामने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 18 चौकारांसह नाबाद 93, शहदात हुसेनने 5 चौकारांसह 29, जाकर अलीने 3 चौकारांसह 22 धावा जमविल्या. सौरभ कुमारने 74 धावात 6 तर उमेश यादव आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. या संपूर्ण मालिकेत फिरकी गोलंदाज सौरभ कुमारची कामगिरी दर्जेदार झाली. उभय संघातील अनिर्णित राहिलेल्या पहिल्या कसोटीत सौरभ कुमारने 5 बळी मिळविले होते. उत्तर प्रदेशच्या या फिरकी गोलंदाजाने दोन सामन्यात एकूण 15 गडी बाद केले आहेत.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश अ प. डाव 80.5 षटकात सर्वबाग 252, भारत अ प. डाव 147.1 षटकात 9 बाद 562 (डाव घोषित) (अभिमन्यू ईश्वरन 157, पुजारा 52, एस. भरत 77, जयंत यादव 83, सौरभ कुमार 55, नवदीप सैनी नाबाद 50, मुशफिक हसन आणि हसन मुराद प्रत्येकी 3 बळी, एस. खान 2 बळी, मोमिनुल हक 1 बळी), बांगलादेश अ दु. डाव 79.5 षटकात सर्वबाद 187 (शदमान इस्लाम नाबाद 93, शहदात हुसेन 29, जाकर अली 22, सौरभ कुमार 6-74, उमेश यादव 2-34, नवदीप सैनी 2-54).

Related Stories

सर्बियाचा जोकोविच उपांत्य फेरीत

Patil_p

सुवर्णजेत्या बॅडमिंटनपटूंचे जंगी स्वागत

Patil_p

बार्सिलोनाकडे स्पॅनिश सुपर चषक

Patil_p

श्रेयस अय्यरचे अर्धशतक, भारत सर्वबाद 252

Patil_p

वर्ल्ड रॅपिड चेसमध्ये सविताला कांस्यपदक

Amit Kulkarni

शदमन इस्लामचे अर्धशतक, वारिकनचे 3 बळी

Patil_p