वृत्तसंस्था/ भुवनेश्वर (ओडिशा)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 2023 च्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेला 13 जानेवारीपासून भुवनेश्वर आणि राउरकेलामध्ये प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी विविध देशांचे हॉकी संघ भुवनेश्वरमध्ये दाखल होत आहेत. या आगामी स्पर्धेत फ्रान्सचा संघ निश्चितच दर्जेदार कामगिरी करेल, अशी ग्वाही कर्णधार व्हिक्टर चार्लेट याने दिली आहे.
फ्रान्सच्या हॉकी संघाचे येथे आगमन झाले. स्पर्धा आयोजकांनी या संघातील खेळाडूंचे विमानतळावर स्वागत केले. या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा फ्रान्सचा संघ अ गटात असून या गटामध्ये बलाढय़ ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. फ्रान्सचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 13 जानेवारीला ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. या स्पर्धेमध्ये फ्रान्सचे खेळाडू दर्जेदार कामगिरी करत जेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील, असा विश्वास कर्णधार चार्लेटने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या प्रति÷sच्या स्पर्धेत फ्रान्सचा हॉकी संघ आक्रमक आणि जलद खेळावर अधिक भर देईल, असेही तो म्हणाला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता फ्रान्सच्या संघामध्ये निश्चितच असल्याचे म्हटले. फ्रान्स संघाने या स्पर्धेसाठी गेले काही दिवस सातत्याने सराव केला आहे. या स्पर्धेतील 13 जानेवारी रोजी होणाऱया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी फ्रान्सचा संघ वेगळे डावपेच आखण्यावर प्रयत्न करेल, त्यानंतरच आपला संघ जेतेपदासाठी विचार करेल, अशी प्रतिक्रिया फ्रान्स संघाचे प्रमुख प्रशिक्षक फ्रेड्रिक सोएझ यांनी व्यक्त केली आहे. या स्पर्धेसाठी विद्यमान विजेता बेल्जियम तसेच जर्मनी व अन्य काही संघांचे यापूर्वीच भुवनेश्वरमध्ये आगमन झाले आहे.